अमळनेर/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- अमळनेर येथील मंगळ – ग्रह सेवा संस्थेला शासनाच्या पर्यटन विभागाने विविध विकास कामांसाठी चार कोटी ९९ लाख रुपये अनुदान जाहीर केले आहे. या निधीतून करायच्या विविध विकासकामांचे तसेच संस्थेच्या खर्चाने राम होणाऱ्या हेलिपॅडचे भूमिपूजन जळगाव लोकसभा क्षेत्रातील सर्वच प्रमुख लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या हस्ते ६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता मंगळ ग्रह मंदिर परिसरात झाले. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील व माजी आमदार स्मिता वाघ, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, ॲड. व्ही.आर.पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, लालचंद सैनानी व निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील राकेश पाटील, प्रफुल्ल पाटील, विक्रांत पाटील, एस. बी. बैसाने, नरेश कांबळे, ललित सौंडागर, जयवंत पाटील, डॉ. अविनाश जोशी, विक्रांत पाटील, मोहन सातपुते, प्रवीण जैन, पंकज मुंदडे, सुंदर पट्टीचे सुरेश पाटील, ऍड. प्रदीप कुलकर्णी, राजेंद्र निकुंभ, भागवत पाटील, डॉ. विजय पवार, प्रशांत सिंघवी, नरेंद्र निकुंभ, मनीष जोशी, अनिल रायसोनी, मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम आणि विश्वस्त आणि प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिर संपूर्ण भारतातील अतिप्राचीन, अतिदुर्मिळ आणि अतिजागृत देवस्थान म्हणून मान्यता मिळालेले वैश्विक पातळीवरील अनेकार्थी हटके देवस्थान आहे.
श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळदेव ग्रहाची स्वयंभू मूर्ती, श्री पंचमुखी हनुमान आणि श्री भूमिमातेची मूर्ती आहे. मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास असल्याचे बोलले जाते. मात्र, मंदिर कोणी बांधले, मूर्तीची स्थापना कोणी व केव्हा केली, या संदर्भातील अधिकृत माहिती उपलब्ध नाही. अमळनेर शहरासह परिसरातील काही जाणकारांच्या मते श्री मंगळदेव ग्रह मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार सन १९३३ मध्ये झाला. परंतू १९४० नंतर मंदिर पुन्हा दुर्लक्षित व नंतर भग्न झाले. १९९९ नंतर झालेल्या जीर्णोद्धाराने मंदिर आणि परिसराचा आता पूर्णपणे झालेला कायापालट भाविक, भक्तांना आकर्षित करण्यात दिवसागणिक यशस्वी ठरत आहे. दरम्यान या निमित्ताने स्वतःच्या मालकीचे हेलिपॅड असलेले श्री मंगळ ग्रह मंदिर राज्यातील एकमेव ठरणार आहे.
।। ग्रहाधीन आहे जगती पुत्र मानवाचा ।।
देशातही स्वतःचे मालकीचे हेलिपॅड असलेली देवस्थाने अत्यंत नगण्य आहेत हे विशेष. राज्यभरात सध्या मंगळग्रह मंदिराचे प्रस्थ वाढलेले आहे. त्यामुळे भाविकांची संख्याही वाढली आहे.अमळनेर या शहराला एक गौरवशाली व सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. मंगल ग्रह व संत सखाराम महाराज ,प्रताप मिलमुळे या शहराचे नाव उंचावले आहे.