Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeजळगावअरे देवा..! अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांची धान्य वाचवण्यासाठी कसरत...! मंडपही उडाला...

अरे देवा..! अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांची धान्य वाचवण्यासाठी कसरत…! मंडपही उडाला…

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह.:-कृषी विभागातर्फे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा, जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषदेतर्फे शिवतीर्थ मैदानावर आज शुक्रवार 28 एप्रिलपासून धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, अवकाळी पावसामुळे हा महोत्सव एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी कळविले आहे.

कृषी विभागाने महोत्सवाचे आयोजन तर केले. मात्र नियोजन न केल्याने स्टॉलधारक शेतकर्‍यांचे पावसामुळे प्रचंड हाल झाले. या धान्य महोत्सवात थेट शेतकरी ते ग्राहक शेतमाल विक्रीसाठी बळीराजा शुक्रवारी महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या अनुषंगाने दाखल झाला. मात्र अवकाळी पावसामुळे या महोत्सवाचा शुभारंभ होऊ शकला नाही. महोत्सवाचे उद्घाटन उद्या दि.29 रोजी शनिवारी होणार आहे.
शेतकरी आणि ग्राहकांचे नाते गुंफणारा आणि थेट रास्त भावात खरेदी-विक्रीचे व्यवहार घडवून आणणार्‍या तीन दिवशीय धान्य महोत्सवाचे आयोजन शिवतीर्थ मैदान (जी.एस. ग्राऊंड) येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सांयकाळी 5 वाजता करण्यात येणार होते. मात्र, शहरात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका या महोत्सवाला देखील बसला आहे. हवामान विभागाव्दारे जिल्ह्यात अवकाळी पावसाबाबत सतर्कतेचा इशारा दिलेला असताना प्रशासनाने नियोजन करताना याबाबत उपाययोजना केली नसल्याचे यातून समोर आले. वादळ व अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर महोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या टेंटवर ताडपत्री लावण्यात आली नव्हती. यामुळे अवकाळी पाऊस सुरू होताच शेतकर्‍यांची विक्रीसाठी आणलेले धान्य पावसापासून वाचविण्यासाठी कसरत करावी लागली.
महोत्सवाची संपूर्ण तयारी झाली होती. परंतु, दुपारी 4.30 वाजेपासून अवकाळी पाऊस सुरू झाला. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार होते. मात्र, ते शुक्रवारी व्यस्त असल्याने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याहस्ते हे उद्घाटन करण्यात येणार होते. पावसामुळे हे शनिवारी पालकमंत्री यांची वेळ घेऊन महोत्सवाचे उद्घाटन केले जाईल. आम्ही सर्वांचा विमा काढला आहे. जसे शेतकरी, शेतकर्‍यांनी आणलेला माल, अधिकारी, कर्मचारी तसेच ग्राहक यांचा विमा काढला आहे. काही नुकसान झाल्यास विम्याच्या माध्यमातून त्यांना भरपाई मिळेल असेही कृषी विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या