Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईमअल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या "त्या" नशिराबादच्या शिक्षकाला जन्मठेप....!कोर्टाने दिला निकाल

अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या “त्या” नशिराबादच्या शिक्षकाला जन्मठेप….!कोर्टाने दिला निकाल

जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथे विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक हा विद्यार्थीनीशी अंगलट करून अत्याचार करत होता.अल्पवयीन विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती परीक्षेत नापास करण्याची धमकी देवून वारंवार शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने गुरूवारी ११ मे रोजी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष बाब म्हणजे, हा आरोपी एका खाजगी कोचिंग क्लासेसचा शिक्षक आहे.

शिक्षक तुषार शांताराम माळी (३३, रा. नशिराबाद परिसर) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला मरेपर्यंत जन्मठेप व सव्वा लाख दंडाची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. हा निकाल जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एन.माने (गाडेकर) यांनी दिला. आरोपी तुषार माळी याचा नशिराबाद परिसरामध्ये श्रीसमर्थ क्लासेस नावाने व्यवसाय होता. अल्पवयीन विद्यार्थिनीची ईच्छा नसताना तिच्या आई-वडीलांना भेटून तुमच्या मुलीला शिष्यवृत्तीचा क्लास माझ्याकडे लावा, मी तुमच्याकडून फी चे पैसे अजिबात घेणार नाही, असे माळी यांनी सांगून विद्यार्थिनीला त्याच्याकडे क्लास लावण्यास सांगितले.
विद्यार्थिनी ऑगस्ट २०१७ पासून क्लासला जायला लागली. माळी हा विद्यार्थिनीला शिष्यवृत्तीच्या बॅचच्या एक तास अगोदर क्लासमध्ये बोलवून चॉकलेट खाण्यास द्यायचा. त्यानंतर घरामध्ये नेवून अत्याचार करायचा. त्याने डिसेंबर-२०१७ ते फेब्रुवारी-२०१८ या कालावधीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत नापास करेल अशी धमकी देवून वारंवार शारीरिक अत्याचार केले.सदर मुलगी ही अत्याचार सहन करत होती. तसेच दोघांचे फोटो लोकांना दाखवून बदनामी करेल, अशीही धमकी शिक्षक माळी हा विद्यार्थिनीला देत होता. त्यामुळे घाबरून ही घटना विद्यार्थिनीने कुणाला काही सांगितली नाही. मात्र, मार्च २०१८ मध्ये विद्यार्थिनीचे पोट दुखत असल्यामुळे तिला तिच्या आईने जळगावातील एका खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यावेळी विद्यार्थिनी ही गर्भवती असल्याची बाब समोर आल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार आईला सांगितला. त्यानंतर १७ मार्च २०१८ रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात तुषार माळी याच्याविरूध्द भादंवि कलम ३७६ (२) (एफ) (आय) (एन) ५०६ प्रमाणे व बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा कलम ३ (अ), ४, ५ (ज) (२), ५ (एल), ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटला जिल्हा न्यायालयातील जिल्हा सत्र व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. माने यांच्या न्यायालयात सुरू होता. खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित विद्यार्थिनी, वैद्यकीय अधिकारी आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या समोर आलेल्या संपूर्ण पुराव्याअंती तुषार माळी यांना दोषी धरून गुरूवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सहाय्यक सरकारी वकील रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले. तर तपास अधिकारी म्हणून आर.एन. खरात यांनी काम पाहिले. या महत्वपूर्ण निकालाने शिक्षकी पेशात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे आणि या घटनेची चर्चा होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या