जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव-उप महाराष्ट्र केसरी व नुकत्याच झालेल्या ‘शिवराय केसरी’ मध्ये विजेतेपदाची गदा पटकवणारे धडाडीचे मल्ल पै. महेंद्र गायकवाड यांचा लौकिकाला साजेसा सन्मान हिंदू युवा प्रबोधिनीने केला. परदेशात मिळवलेले यश, महाराष्ट्र केसरीतील उपविजेतेपद, शिवराय केसरीचे विजेतेपद याबद्दल त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शिवप्रतापाचे चित्र, शाल श्रीफळ फेटा’ असे सन्मानित केले. याप्रसंगी हिंदू युवा प्रबोधिनीचे प्रमुख राजेंद्र बेंद्रे म्हणाले, ‘कुस्तीला धर्म नसतो, पण काही व्यक्तींनी महेंद्रला विजेतेपद मिळाल्यानंतर मुद्दाम या यशाला डावलण्यासाठी धर्माची चौकट करुन अपप्रचार केला. खेळात असा धर्म आणून कोणी मेहनत करणाऱ्या पैलवानांना डावलणार असेल, तर आम्ही महेंद्र व इतर सर्व पहिलवानांच्या मागे ताकदीने उभे राहू’ अशी भूमिका मांडली. लेखक सौरभ कर्डे यांनी ‘पैलवान, तालिम याची परंपरा व शिवकाळातील मल्ल’ याचा इतिहास मांडला. या प्रसंगी भारत केसरी पै.विजय गावडे, महा एनजीओ फेडरेशनचे शेखर मुंदडा, इतिहास संशोधक अशोक सरपाटील, सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम, आरोग्यदूत सोमनाथ भोसले, पोलीस पाटील किरण शेळके, माजी उपसरपंच सुनीत लिंबोरे,ह.भ.प.विश्वास कळमकर, दादा दाभाडे हे उपस्थित होते.
अरविंद वारुळे, लोकेश कोंढरे, विशाल पवार, किरण शिंदे, अविनाश तायडे यांनी आयोजन केले.ॲड.अनिरुध्द बनसोड यांनी सूत्रसंचालन केले.