नवी दिल्ली-वृत्तसेवा:- बहुभाषिक शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सीबीएसईच्या शाळांमध्ये भारतीय भाषांचा वापर प्रत्यक्षात आणण्यासाठी पर्यायी माध्यमातून भारतीय भाषांचा उपयोग करण्याचा प्रस्ताव आहे. CBSE च्या निर्णयानुसार, सीबीएसई मंडळाशी संलग्नित शाळांमध्ये प्री-प्रायमरी ते बारावीपर्यंत प्रादेशिक भाषांमधून शिकण्याचा पर्याय मिळणार आहे. यासंदर्भात, सीबीएसईने शाळांना पत्र पाठवून, बहुभाषा शिक्षण विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
एनसीईआरटी आणि शिक्षण मंत्रालयाने बहुभाषी शिक्षणाला चालना देण्यासाठी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत विविध भाषांमधून शिक्षण देण्यात येणार आहे.शाळांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या अभ्यास साहित्याचा पुरेपूर वापर करावा आणि परस्पर सहकार्यातून बहुभाषी शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे, अशी भूमिका सीबीएसईने घेतली आहे. CBSE च्या नवीन धोरणानुसार सीबीएसईचे शिक्षण संचालक जोसेफ एम्यॅन्युएल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण २२ भाषांमध्ये एनसीईआरटीची पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहेत. देशाच्या संविधानातील आठव्या अनुसूचीत नमूद २२ भाषांमध्ये पुस्तके तयार होणार आहेत. सध्या सीबीएसईच्या शाळांमध्ये केवळ इंग्रजी आणि हिंदी माध्यमांचा पर्याय उपलब्ध आहे. CBSE चे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणातील मातृभाषेतून शिक्षण या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी सीबीएसईने उचललेले हे पहिले पाऊल आहे, असेही एम्यॅन्युएल यांनी स्पष्ट केले. या महत्वपूर्ण निर्णयासाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सीबीएसईचे अभिनंदन केले आहे.