जळगाव/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यात सध्या विविध घटना घडत आहेत.जळगाव शहरातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने विषारी औषध पिऊन एमआयडीसीतील कंपनीत साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. संजय बंडू शेवाळे (वय ३६, रा. विखरण ता. शिरपूर, धुळे ह.मु. मेहरूण, जळगाव) असं मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाने गळफास घेतला नसून त्याचा मृत्यू संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नेमका मृत्यू कसा झाला याबाबत अजून कळू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय बंडू शेवाळे हा गेल्या १० वर्षांपासून जळगाव शहरातील मेहरूण परिसरात आई, पत्नी आणि दोन मुलांसोबत वास्तव्याला होता. संजय हा एमआयडीसी परिसरातील साईराम ट्रेंडींग कंपनीतील कोल्ड स्टोरेज या ठिकाणी कामाला होता.अतिशय मेहनती व स्वभावाने खूप चांगला होता अशी माहिती मिळाली आहे. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ८ वाजता जेवणाचा डबा घेवून संजय हा कंपनीत कामावर गेला होता. काल सोमवारी कामगार दिन असल्यामुळे कंपनी बंद होती. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कंपनीतील सफाई कर्मचारी हा साफसफाई करण्यासाठी गेला होता. यावेळी लोखंडी अँगलला संजय शेवाळे याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने तातडीने एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला. रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करत आहेत. संजय याने अगोदर विषारी औषध घेतलं, त्यानंतर गळफास घेतला असल्याचे पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे तरुणाची आत्महत्या नसून त्याचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचा आरोप मयत संजय याच्या नातेवाईकांनी केला आहे. घातपाताचा तर हा प्रकार नसेल ना ? असे ही बोलले जात आहे.
मयताच्या पश्चात आई कमलबाई, पत्नी आश्विनी, विवाहित बहिण, दुर्गेश (वय ४) आणि सलोनी (वय ६) ही दोन मुलं आहेत. कोवळ्या वयातच या चिमुकल्यांचे पितृछत्र हरपल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेमुळे औद्योगिक वसाहत परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.