केदारनाथ- पोलीस दक्षता लाईव्ह,
केदारनाथ/ विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- हिंदू धर्माशी संबंधित असलेल्या 12 ज्योतिर्लिंग पैकी एक बाबा केदारनाथ यांचे निवासस्थान उत्तराखंडच्या मैदानी भागात आहे.भारतात 12 ज्योर्तिलिंगांना विशेष महत्त्व आहे. चारधाम यात्रा करणे हे देखील भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. केदारनाथ हे चारधाम यात्रेतील एक धाम असून 12 ज्योर्तिलिंगापैकी खूप महत्त्वाचे मानले जाते. केदारनाथचे दरवाजे हे सहा महिन्यांसाठी बंद असतात तर सहा महिने ते भक्तांसाठी उघडले जातात. केदारनाथमधील भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन हे दरवाजे बंद ठेवले जातात. गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडताच चारधाम यात्रेची सुरुवात होते. आता आज दि. 25 एप्रिलला म्हणजेच मंगळवारी केदारनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत.
आज श्री.क्षेत्र केदारधामचे दरवाजे उघडण्यात आले असल्याने त्याची जोरदार तयारी केदारनाथ मंदिर परिसरात सुरु होती. परिसरात भक्तिमय वातावरण आणि शिव शंभू चा जयघोष होत आहे. 23 क्विंटल फुलांची आरास या मंदिराला करण्यात आली आहे.. मंदिराचे कर्मचारी यांनी परिसरात मंदिर सजवण्याचे काम केले. केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी शुभ मुहूर्त काढला जातो आणि त्याच मुहूर्तावर हे दरवाजे उघडले जातात. यावर्षी मंगळवारी 25 एप्रिलला सकाळी 6 वाजून 20 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले. केदारनाथ मंदिर ज्या परिसरात आहे, तेथील हवामानात कायम बदल होत असतात. त्यामुळे येथील हवामानाची स्थिती दरवाजे उघडण्यास अडथळा निर्माण करते. सकाळी कडक ऊन आणि संध्याकाळी होणारी बर्फवृष्टी त्यामुळे येथील हवामानात बरेच बदल होत आहेत. गेल्या 3 दिवसांपासून बर्फवृष्टी होत असून भाविकांना रोखण्यात आले आहे.
केदारनाथाचे दरवाजे सहा महिन्यांनंतर उघडणार असल्याने भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी येथे पहायला मिळत आहे. भक्तीभावाने देशभरातून लोकं केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी येतात. दरवाजे उघडण्याचा सोहळा पाहण्यासाठी येथे भक्तगण मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पण खराब वातावरणामुळे भक्तांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे भक्तांनी सांभाळून राहण्याचे तसेच काळजी घेण्याचे आवाहन येथील प्रशासनाने केले आहे.
या कार्यक्रमावेळी उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंह आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील उपस्थित होते. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केदारनाथ धामचे दरवाजे सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी उघडले गेले. भारताच्या विविध राज्यातून तसेच महाराष्ट्र आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक शिव भक्त कोणी परिवारासह तर कोणी मित्र मंडळींसह ग्रुपने श्री क्षेत्र केदारनाथकडे दर्शनासाठी निघाले आहेत.