Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeजळगावगावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी व पत्रकार संदीप महाजन...

गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी व पत्रकार संदीप महाजन यांच्यासह कुटुंबियाला पोलीस संरक्षण देण्यात यावे: जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

जळगाव/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना बुधवारी पाचोरा येथील नगरपालिकेसमोर काही व्यक्तींनी अमानुष मारहाण केली. त्यांना करण्यात आलेली मारहाण ही पत्रकारिता क्षेत्राला काळिमा फासणारी घटना आहे.घटना ही खूप निंदनीय आहे. गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना आणि इतर पत्रकार संघटना यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. उपस्थित सर्व पत्रकारांनी काळ्या फिती लावून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेला मारहाणीचा प्रकार हा निंदनीय असून अशाप्रकारे मारहाण करून गुंडगिरीचे समर्थन करणाऱ्या या तथाकथित गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच संदीप महाजन आणि त्यांच्या कुटुंबियाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन गुरुवारी १० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

संदीप महाजन हे पाचोरा शहरात पत्रकारिता करतात. साप्ताहिक ध्येय व ध्येय न्यूज पोर्टलचे ते संपादक आहेत. जवळपास ते २२ ते २४ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत,ते त्यांच्या परिवारासह पाचोरा शहरात वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात एक वृत्त प्रसारित केले होते. त्यावेळी आमदार किशोर पाटील यांनी वाईट वाटून त्यांना फोन करून अश्लील शब्दात शिवीगाळ करीत धमकी दिली होती. तसेच शिवीगाळ केल्याबद्दल त्यांनी माध्यमांच्या समोर कबूलही केले होते की ‘ हो…! मी त्या पत्रकाराला ( संदीप महाजन ) याला शिवीगाळ केलेली आहे.’ या घटनेनंतर मात्र पाचोरा शहरात संमिश्र पडसाद उमटले होते. पत्रकार महाजन यांनी पोलिसांकडे पोलीस संरक्षणाची मागणी करत आमदार किशोर पाटील यांच्यापासून स्वतःला व माझ्या कुटुंबीयांना धोका असल्याची माहिती दिली होती. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारे संरक्षण देण्यात आले नव्हते. संरक्षण मिळावे असे पत्र दिल्यावर सुद्धा ते मिळत नाही ,म्हणजे पोलीस प्रशासनावर एक प्रकारे राजकीय दबावच आहे. बुधवारी ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ते रेल्वेच्या आंदोलनाची बातमी घेऊन त्यांच्या घरी जात असता नगरपालिकेसमोर अज्ञात तीन ते चार गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी त्यांच्या तोंडावर रुमाल फेकला आणि दुचाकीवरून त्यांना जोरात खाली पाडले. त्यानंतर चार ते पाच गुंडांनी लाथा बुक्क्यांनी तुडवत त्यांना बेदम मारहाण केली गेली.डोके,पाठ ,कंबर आणि चेहऱ्यावर पायांनी मारहाण केली. ” आमच्या किशोर आप्पाच्या नादी यापुढे लागलास तर याद राख “, अशी धमकी त्यांना गुंडांनी दिली. या घटनेनंतर घाबरून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यानुसार पाचोरा पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना आज ३५ ते ४० पत्रकारांतर्फे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदन स्वीकारतेप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले,” मी स्वतः पोलीस अधीक्षकांशी बोलतो. घटनेतील गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत सूचना देतो. पत्रकारांवर अन्याय होणार नाही , मेडिकल आदींबाबत मी सूचना करतो ” असेही त्यांनी सांगितले.निवेदन देताना नरेंद्र कदम, तुषार वाघुळदे,सुमित देशमुख, हेमंत पाटील, विजय वाघमारे, ललित खरे, भगवान सोनार, रजनीकांत पाटील, कमलेश देवरे, अमोल कोल्हे, योगेश चौधरी, वाल्मिक जोशी, वर्धमान जैन, काशिनाथ चव्हाण, शाळीग्राम पवार, नाजनीन शेख, संधीपाल वानखेडे, नितीन नांदुरकर, विजय पाटील, धर्मेंद्र राजपूत, वाहिद काकर, सागर चौधरी, हेमंत ई. पाटील, अयाज मोहसीन, अस्लम खान, किशोर शिंपी, राहुल शिरसाळे, नितीन सोनवणे यांच्यासह अन्य इतरही पत्रकार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या