नाशिक/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-चांदवड (जि. नाशिक ) येथील श्री.नेमिनाथ जैन प्राथमिक शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका जयश्री गोळेचा हे प्रकरण गेल्या 2 वर्षांपासून चर्चेत आहे. विविध शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून सुद्धा योग्य तो न्याय न मिळाल्याने शेवटी श्रीमती गोळेचा यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई कार्यालयात स्वतः जाऊन दि .12 एप्रिल 2023 रोजी तक्रार दाखल केली होती.या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील समुपदेशक आणि सदस्य यांनी गोळेचा यांची पूर्ण बाजू ऐकून घेतली .
महिला आयोगाने त्याची दखल घेऊन दि. 26-एप्रिल 2023 रोजी पोलीस अधीक्षक नाशिक आणि शिक्षण उपसंचालक नाशिक यांना पत्रव्यवहार करून योग्य ती कार्यवाही करून अर्जदारास कळविले. तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा 1993 कलम 12(2) व 12 (3) नुसार केलेल्या कार्यवाहीचा तपशील तात्काळ राज्य महिला आयोगास पाठविण्यास सांगितला आहे.
श्रीमती गोळेचा यांनी राज्य महिला आयोगात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, 20 ऑक्टोबर 2020 संस्थेचे पदाधिकारी बेबीलाल संचेती,जवाहरलाल आबड, झुंबरलाला भंडारी आणि इतर यांनी अर्वाच्य व अपशब्द वापरून राजीनामा देण्याची मागणी करू लागले.तसेच एका बंद खोलीत तब्बल साडेपाच तास डांबून मोबाईल ताब्यात घेऊन बंद करून ठेवला असा आरोप आहे. कोऱ्या कागदांवर सह्या घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे चार लेखी राजीनामा अर्ज लिहून देण्यास भाग पाडले.
या प्रकरणी गोळेचा यांनी अर्जात 7 सविस्तर मुद्दे व 37 पानांचे दस्तऐवज कागदपत्रे सादर केले. शेवटी नमूद केले आहे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषी असणाऱ्यांना योग्य ते शासन होऊन न्याय मिळावा अशी अपेक्षा गोळेचा यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या प्रकरणाची इत्यंभूत माहिती या आधी सुद्धा पोलीस दक्षता लाईव्हने परखडपणे वृत्त प्रकाशित केल्याने शैक्षणिक क्षेत्रासह इतर ठिकाणीही याची खूप चर्चा झाली होती.. गोळेचा प्रकरणाला यामुळे काही अंशी न्याय मिळाला आहे.