Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याझोक्याला बांधलेल्या रूमालामुळे बसला गळफास ,बाळाचा मृत्यू; जामनेरातील घटना

झोक्याला बांधलेल्या रूमालामुळे बसला गळफास ,बाळाचा मृत्यू; जामनेरातील घटना

जामनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- झोक्याला फास बसून एका बाळाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना जामनेर शहरात घडली आहे. आपल्या बाळाला झोक्यात झोपवून कामावर निघून जाणे एका आईला चांगलेच महागात पडले आहे. बाळ झोक्यातून पडू नये म्हणून त्याला आईने रुमाल बांधला होता. मात्र याच रुमालाने बाळाला झोपेतून उठल्यानंतर रुमालाचा गळफास लागला. यात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटना गुरुवारी दुपारी जामनेर शहरातील गिरीजा कॉलनीत घडली आहे. निर्भय वसंत इंगळे असं अवघ्या एका वर्षाच्या मयत चिमुकल्याचं नाव आहे. दहा दिवसांपूर्वीच निर्भयचा पहिला वाढदिवस साजरा झाला होता. गिरीजा कॉलनीत वसंत इंगळे हे पत्नी व कुटुंबासह वास्तव्यास आहेत.इंगळे हे खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. तर त्यांची पत्नी रुग्णालयात कामाला आहे. गुरुवारी वसंत इंगळे हे सकाळी नेहमीप्रमाणे कामाला निघून गेले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने कामावर जाण्यापूर्वी मुलगा निर्भयला दूध पाजले. मग त्याला झोपविले. निर्भय झोक्यातून पडू नये म्हणून मध्यभागी झोक्याला रुमाल बांधला. त्यानंतर घरात असलेल्या तिच्या धाकट्या बहिणीला निर्भयवर लक्ष ठेवण्यात सांगून निर्भयची आई रुग्णालयात कामावर निघून गेली. निर्भयच्या मावशीने जेवणापूर्वी झोळीतील निर्भयकडे डोकावून पहिले असता तो झोपेत होता. त्यानंतर जेवण करून परतल्यानंतर पुन्हा निर्भयला पाहण्यासाठी मावशी केली असता, निर्भय हा झोक्याबाहेर लटकलेला अवस्थेत दिसून आला, ते पाहन निर्भयच्या मावशीला धक्का बसला. बाळाला बाहेर काढले, मात्र तो हालचाल करीत नव्हता. निर्भयच्या आई आणि वडिलांना बोलवून घेतले.तातडीने निर्भयला जवळच्या खासगी दवाखान्यात नेले, मात्र तोपर्यंत निर्भयने प्राण सोडले होते. त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच निर्भयच्या आई वडीलांसह कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. अचानक जागं झालेल्या बाळाने खाली उतरण्याचा प्रयत्न करताच त्याच्या संरक्षणासाठी बांधलेला रुमालच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. अनपेक्षितपणे झालेल्या मृत्यूने कुटुंबात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या