पनवेल/ विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-पनवेल पोलिसांच्या तत्परतेचे अनेक उदाहरणे पाहिली आहेत. आणि अनेक गुन्हे उघडकीस आली आहेत..अल्पवयीन मुलीला कॉलेजमधील अल्पवयीन तरुणाने गोवा राज्यात पळवून नेले होते. तो त्याच ठिकाणी वास्तव्य करून नोकरी करत होता याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी यांनी विशेष तपास करून गोवा येथे जाऊन या दोघांनाही पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पनवेल परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीचे तिच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणासोबत प्रेम जुळले. त्यानंतर त्या दोघांनी गोवा राज्यात पलायन केले. याबाबतची तक्रार तरुणीच्या घरच्यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात करताच गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाद्वारे या दोघांचा पोलिसांनी शोध घेतला. ते दोघे जण गोवा राज्यातील कलंगुट बीच या परिसरात वास्तव्यास असून, तेथे नोकरी करत असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले व पनवेल शहर पोलिस ठाणे येथे आणण्यात आले. मुलीला तिच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पनवेल शहर पोलीस पोलीस उपनिरीक्षक गिरी यांच्या या कामगिरीचे पनवेलमधील नागरिक कौतुक करीत आहेत.