नाशिक/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नाशिकमध्ये म्हसरूळ परिसरात गुरूवारी घेण्यात आलेल्या तलाठी ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी म्हसरुळ परिसरातील केंद्राबाहेरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन ई.साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
काल राज्यभरात तलाठी भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. नाशिकमधील म्हसरूळ या ठिकाणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वेबईझी इन्फोटेक या परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा घेतली जात असताना. एका संशयिताच्या मोबाईलमध्ये काही संगणकावरील प्रश्नपत्रिकेचे फोटो आढळल्याने या परीक्षेमध्ये गैरप्रकार घडल्याचं उघडकीस आले. परीक्षा केंद्राच्या बाहेर एक व्यक्ती संशयास्पद रित्या फिरत असल्याच दिसताच त्याचा संशय आल्याने त्याची पोलिसांकडून अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडून एक टॅब, एक वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, हेडफोन आणि असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरूणाला अटक केली असून यामागे एखादे मोठे रॅकेट तर नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संशयिता सोबत अजून कोणी साथीदार आहेत का याचाही तपास पोलीस करीत आहे. या मुळे राज्यातील विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये होणारा घोळ काही केल्या थांबेना असे काही चित्र समोर येत आहे.

