Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यापालकमंत्री गुलाबराव गेले कुठे? बुलढाण्यात कधी येणार? आंदोलकांचे पोस्टर्स लावून आंदोलन....!

पालकमंत्री गुलाबराव गेले कुठे? बुलढाण्यात कधी येणार? आंदोलकांचे पोस्टर्स लावून आंदोलन….!

बुलढाणा/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता:- अरेरे …!! काही गोष्टी अशा असतात की त्याचे अनेकांना आश्चर्य व अप्रूप वाटत असते. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव,नांदुरा ,मलकापूर ,सिंदखेडराजा, लोणार,मेहकर, चिखली यासह आदी तालुके व खेड्यापाड्यात सध्या सर्वांनाच अजब (नवल ) वाटेल असे पोस्टर झळकले आहेत, त्याची सर्वत्र खुमासदारपणे, गटागटाने चर्चा रंगली आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या विरोधात गावोगावी पोस्टर्स लागलेले दिसून येत आहेत. “गुलाबराव पाटील हरवले आहेत”…! असं या पोस्टर्सवर स्पष्टपणे लिहिलेलं आहे. पोस्टर्स लावणाऱ्यांनी गुलाबरावांच्या विरोधात आंदोलनही केलं आहे.त्या अभिनव आंदोलनाचीही चर्चा चांगलीच रंगलीय.. विशेष म्हणजे आंदोलन करणारे आणि पोस्टर्स लावणारे ठाकरे गटाचे नाहीत. त्यामुळे गुलाबराव पाटील यांची अडचण अधिकच वाढली आहे. राष्ट्रवादी नाही की ,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नाही की काँग्रेस नाही,तसेच रिपब्लिकन पक्ष नाही,वंचित आघाडी नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे पाऊल उचलले आहे. या संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी हे पोस्टर्स झळकवले आहेत.

बघाना आता हेच आंदोलन…! कोणते आंदोलन कसे होईल हे सांगता येत नाही. शोधून देणाऱ्यांना 51 हजार नव्हे तर फक्त 51 रुपये बक्षीस दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. संपर्कासाठी प्रशांत डिक्कर यांनी खुद्द स्वत:चं नाव आणि मोबाईल नंबर दिला आहे. गावागावातील नाक्यानाक्यावर, विविध हॉटेल्स , सार्वजनिक जागी ,चहा आणि पान टपऱ्यांवर हे पोस्टर्स लावले आहेत; हे पोस्टर्स पाहण्यासाठी गावागावात झुंबड उडाली आहे.

नाक्यावर, चहाच्या टपऱ्यांवर, चावडीवर आता या पोस्टर्सची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्यातरी हाच विषय चर्चेचा ठरला असून इतर विषय मागे पडले आहेत. एकनाथ शिंदे सरकार स्थापन होऊन जवळपास दहा महिने उलटले, पालकमंत्र्यांची नियुक्ती होऊन नऊ महिने झाले, या काळात अवकाळी पाऊस, तर कुठे चक्रीवादळामुळे शेतकरी त्रस्त आहे.. बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी मेटाकुताला आला आहे.
अद्यापही बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याचा दौरा केलेला नाही. कुठलीच पाहणी केलेली नाही. पाटील यांनी साधं शेतकऱ्यांचे सांत्वन सुद्धा केलेलं नाही. विदर्भ आणि खान्देश असाच दुजाभाव ना.पाटील हे करत तर नाही न…? असा सूर निघत आहे. अहो गुलाबराव इकडे या …! जिल्ह्यात फिरा …!! पालकमंत्री आहेत न ..? मग आमचे पालक कोण..! असेच विविध प्रश्न अनेक जण उपस्थित करत आहेत. दरम्यान जळगाव ( खान्देश ) चे शिंदे सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील हे दौऱ्यावर केव्हा येतात हीच प्रतीक्षा आता लागून आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या