Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावपालकमंत्र्यांच्या मुलाचे भावी आमदार म्हणून बॅनर झळकले..राजकीय गोटात चर्चेला उधाण; अनेक जण...

पालकमंत्र्यांच्या मुलाचे भावी आमदार म्हणून बॅनर झळकले..राजकीय गोटात चर्चेला उधाण; अनेक जण अचंबित…!

जळगाव/ कार्यकारी संपादक  तुषार वाघुळदे/ पोलीस दक्षता लाईव्ह:- राजकारण हे मोठे विचित्र व सर्वांना बुचकळ्यात टाकणारे आणि सर्वानाच अचंबित करणारे असते. केव्हा काय होईल व काय चित्र पालटेल याची शाश्वती नसते..जळगाव जिल्ह्यात सध्या या-ना त्या कारणाने राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत असून एकमेकांवर शब्दांच्या फैरी झाडण्यात दंग झालेले दिसून येत आहे.

जळगाव जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य प्रताप पाटील यांचा वाढदिवस नुकताच हर्षोल्हासात साजरा करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.काही समर्थकांनी तर चक्क “भावी आमदार” अशा आशयाचे बॅनर अनेक ठिकाणी लावल्याने राजकीय गोटात चर्चेला अक्षरशः उधाण आल्याचे दिसत असून तसेच याबद्दल विविध कट्ट्यावर वेगवेगळी चर्चा रंगू लागली आहे..गटागटाने गप्पा सुरु आहेत. काहींना याचे नवल वाटत आहे तर काहींना अप्रूप…!
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांचा उद्या वाढदिवस आहे. या अनुषंगाने जळगाव शहरात भावी आमदार प्रताप पाटील असे बॅनर लागले आहेत. यामुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. अनेक पादचारी व वाहन धारक थांबून त्या बॅनरकडे बारकाईने निरीक्षण करत असतानाचे दृश्य दिसत आहे.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव ग्रामीण हा मतदारसंघ आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांचा मुलगा प्रतापराव पाटील यांच्याकडे बघितले जाते , हे साहजिकच आहे.सध्या प्रताप पाटील हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत.त्यांनी मतदार संघात अनेक विकास कामे केली असून इतर कामे प्रगतीपथावर आहेत. असे असताना मात्र, आता जळगाव शहरात त्यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागल्याने जळगावच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. जळगावात खूप राजकीय अभ्यासक आहेत.जो तो वेगवेगळ्या पद्धतीने तर्क-वितर्क लावत असतो. आगामी विधानसभा निवडणुकीत नेमके कसे चित्र असेल ? कोणाच्या विरोधात कोण उमेदवार असेल ? हे सांगणे कठीण असून काही हवशे-नवसे आतापासूनच सुद्धा गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत ,याचेही नवलच …!
सद्यस्तिथीत गेल्या दोन टर्मपासून जळगाव शहराचे आमदार भाजपचे जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे आहेत.त्यांनीही विकासकामांचा धडाका सुरू ठेवला आहे.यात चढाओढ सुरू असून काही जण विकासकामांचे श्रेय उपटण्यात माहिर असल्याचा बोलबाला करत आहेत. मात्र आता तर खुद्द पालकमंत्र्यांच्या मुलाचे भावी आमदार म्हणून पोस्टर मध्यवर्ती भागात झळकल्याने राजकीय गोटासह सामान्य नागरिकांमध्ये सुद्धा याबाबतच्या चर्चा खुमासदारपणे रंगू लागल्याचे चित्र दिसत आहे. राजकीय पक्षांत भविष्यात नेमके काय आणि कसे चित्र असेल ही येणारी वेळच सांगेल.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या