मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
मुंबई / कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे / पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगाने कामे सुरू झाली आहेत. आता ठाणे ते बोरिवली प्रवास सोपा होणार आहे. या प्रवासासाठी लागणारा दोन तासांचा वेळ कमी होऊन या मार्गावरुन थेट १५ मिनिटांत प्रवास करता येणार आहे.
बहुप्रतिक्षित बोरिवली – ठाणे टनल रोड प्रोजेक्टचं काम लवकरच सुरू होणार आहे. राज्यातील सर्वात लांब बोरिवली – ठाणे टनल रोडसाठीचं काम दोन कंपन्यांना मिळू शकतं. या प्रकल्पासाठी लार्सन अँड टुब्रो अर्थात एलएनटी आणि मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या दोघांना या प्रकल्पाचं काम मिळू शकतं, असे बोलले जात आहे. हा प्रकल्प २०१५ मध्ये प्रस्ताविक करण्यात आला होता. मात्र आता त्याचं काम लवकरच सुरू होईल अशी माहिती मिळाली आहे. या भागात ट्रॅफिकमुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
ठाणे – बोरिवली टनल ११.८४ किमी इतका लांब असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यात प्रकल्पात दोन पॅकेज असतील. त्यापैकी एक बोरिवलीकडे जाणारा ५.७५ किमी लांब जुळ्या ट्यूब रोड टनलचं डिझाइन लार्सन अँड टुब्रो कंपनीला दिलं जाईल. तर पॅकेज दोनमध्ये ठाण्याकडे जाणाऱ्या ६.९ किमी लांब जुळ्या ट्यूब रोड टनलचं डिझाइन आणि निर्मिती करण्याचं काम मेघा इंजिनिअरिंगकडे दिली जाईल. त्याशिवाय या दोन्ही टनलवरुन संयुक्तपणे एक किमीचे रस्ते तयार होतील.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सर्वांनाच लाभ होणार असून वेळेची खूप मोठी बचत होणार आहे,प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
घोडबंदर रस्त्यावरील प्रचंड वाहतूककोंडी टाळून बोरीवली ते ठाणे असा प्रवास अवघ्या वीस मिनिटांत करणे शक्य होणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून ठाणे ते बोरिवली दरम्यान दोन भुयारी मार्ग (ट्विन ट्युब बोगदा) खोदून वाहतुकीचा हा नवा पर्याय खुला करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ कडून निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील १,४६० दिवस अर्थात चार वर्षांमध्ये ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन ‘एमएमआरडीए’ ने केले आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी टाळून थेट मुंबईतून ठाणे किंवा ठाण्यातून मुंबई असा प्रवास करणे शक्य होणार आहे.
एमएसआरडीसी’कडून हा नियोजित करण्यात आलेला हा प्रकल्प तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या होत्या. त्यानुसार या प्रकल्पाचे आता ‘एमएमआरडीए’कडे हस्तांतरण करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.