भडगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत खून केल्याची घटना ताजी असतांना पुन्हा एकदा धक्कादायक अशीच घटना घडली.पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अत्याचारानंतर तिच्या डोक्यावर दगडाने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्तबंबाळ अवस्थेत पीडितेने नराधमाच्या तावडीतून सुटका करून घेत जीव वाचवला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पारोळा येथे पोलीस ठाण्यात येऊन महामार्गावर रास्ता रोको केला. आणि विविध प्रकारच्या घोषणा दिल्या..परिसर दणाणून गेला होता.त्यानंतर पोलिसांनी बारक्या ऊर्फ अशोक मंग्या भिल (२२) याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सायंकाळी गावाबाहेर असलेल्या नदीपात्राजवळ शौचासाठी गेली होती. या वेळी बारक्याने तिला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. मुलीने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करत रक्तबंबाळ अवस्थेत घराकडे धाव घेत घडलेला प्रकार आपल्या कुटंुबाला सांगितला. हा प्रकार तिचा भाऊ आणि आईने ग्रामस्थांना सांगितला. प्रथम उपचार करा, असा सल्ला ग्रामस्थांनी दिल्यानंतर रात्री पारोळा कुटीर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तिला धुळे येथे हलवण्यात आले आहे. पीडित मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अशोक मंग्या भिल याच्याविरुद्ध पोक्सोकायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हे करीत आहेत.