जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- रावेर तालुक्यातील निंभोरासिम येथे मागासवर्गीय वस्तीच्या पुनर्वसनाकरिता महाराष्ट्र शासनाने भूसंपादित केलेल्या जागेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून होत असलेले बांधकाम थांबवण्यासाठी व सदर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी निंभोरासिम येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले .निवेदनात नमूद निवेदनकर्त्यांनी लिहिलेले आहे की , मौजे निंभोरासिम येथील मागासवर्गीय वस्तीच्या पुनर्वसनाकरिता निंभोरासिम येथील भूसंपादन जमीन शेत गट नंबर 167 क्षेत्र 91 आर यावर अनधिकृत बांधकाम करून ही जमीन शासनाच्या मालकीची असतांना देखील जमिनीवर सुरेश सीताराम पाटील आणि इतर तीन व्यक्तींनी अतिक्रमण करून बांधकाम केलेले आहे व हल्ली देखील बेकायदेशीररित्या बांधकाम सुरू आहे वास्तविक पाहता सदर जमिन मागासवर्गीय समाजाच्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाचा आदेश झालेला आहे. याबाबत अतिक्रमणधारक व्यक्तींना पूर्णपणे माहिती व कल्पना आहे. तरी देखील सदर व्यक्तींनी शासन संपादित जमिनीवर पक्के आरसीसी बांधकाम केले आहे आणि हल्ली सुद्धा बांधकाम करीत आहेत. व्यक्तींच्या या बेकायदा कृत्याबाबत आम्ही यापूर्वी देखील जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार दिलेली आहे. त्यानुसार फैजपूरचे उपविभागीय अधिकारी यांनी सदरचे बांधकाम थांबवणे बाबत तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांना सूचना दिलेल्या आहेत. तरी देखील संबंधितांनी प्रशासकीय सूचनेला न जुमानता भूसंपादित जमिनीवर बांधकाम सुरू केलेले आहे. निंभोरासिम या गावात मागासवर्गीय समाज अत्यल्प आहे. अशा पद्धतीने अन्याय होत आहे. तरी मागासवर्गीय समाजाच्या पुनर्वसनासाठी शासनाने संपादित केलेल्या या जमिनीवर झालेले व सुरू असलेले बांधकाम निष्काशीत करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास यावे. मागासवर्गीय समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी मुकुंद सपकाळे, दिलीप सपकाळे राजू सवर्णे, राजेंद्र सवर्णे, विकास सवर्णे, संजय सवर्णे, किरण सवर्णे, सुनील सवर्णे, मगन सवर्णे, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, वसंत सवर्णे, जीवन सवर्णे, पंडित सवर्णे आदींनी केलेली आहे.