मुंबई/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुंबई पोलिसांनी काल वाकोला भागात एका हॉटेलमध्ये ग्राहकांना मसाज आणि स्पा सेवा देण्याचे आमिष दाखवून बंदुकीच्या धाकावर लुटणाऱ्या सात आरोपींच्या टोळीला अटक केली आहे. नीलेश शिवकुमार सरोज , विशाल राजेश सिंग,आदित्य उमाशंकर सरोज आणि सुरेश रामकुमार सरोज अशी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीची नावे आहेत. या टोळीवर धमकावणे, चोरी आणि बेकायदेशीरपणे पैशांची देवाण-घेवाण अशा विविध गुन्ह्याची नोंद आहे.
वाकोला पोलिसांना टोळीला पकडण्यात यश मिळाल्याने अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे. तक्रारदाराने ७ जुलै रोजी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयितांनी हॉटेलमध्ये मसाज सेवा देण्याच्या निमित्ताने त्यांना एका हॉटेलमध्ये नेले. हॉटेलमध्ये गेल्यावर आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांना लुटले. तसेच आरोपींनी पीडित व्यक्तीच्या बँक खात्यांमधून आरोपींच्या स्वत: च्या खात्यात ९५ हजार रुपये रक्कम ऑनलाईन हस्तांतरित केली, तसेच पीडितांच्या पाकीटातील १० हजार रोकड जबरदस्तीने काढून घेतली. घटनेनंतर पिडीत व्यक्तीने स्थानिक पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर वाकोला पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. वाकोला पोलिसांनी तातडीने पथक तयार करून संशयित आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त माहितीदारांकडून पोलीस पथकाला आरोपी अंधेरी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत सापळा रचला आणि आरोपी नीलेश आणि त्याच्या साथीदारांना यशस्वीरित्या पकडले. आमिषाने फसवणूक अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक यापूर्वी मुंबईतील स्पा सेंटरमध्ये काम करत होता. त्याच्याकडे काही ग्राहकांचे संपर्क तपशील असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपी ग्राहकांशी संपर्क करून वस्त दरात सेवा देण्याचे आमिष दाखवत होते. एकदा ग्राहक हॉटेलमध्ये आला मी तेव्हा आरोपी त्यांना बंदुकीच्या धाकावर धमकावून लुटत असत. पोलिसांनी आरोपीकडून तीन जिवंत काडतुसे, दहा हजार रुपये रोख आणि एकूण नऊ मोबाईल फोन्ससह अनेक पुरावे जप्त केले आहे.पुढील तपास बारकाईने सुरू आहे