मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
जळगाव / कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- रावेर तालुक्यातील वाघोदा रस्त्यावर झालेल्या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. या अपघाताचे सविस्तर वृत्त असे की , भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथे ३२ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर वाहन हे भरदाव वेगाने धावत होते. युनुस इतबार तडवी (वय ३२) रा. वाघोदा बुद्रुक ता. रावेर असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. युनूस तडवी हा आई, पत्नी व दोन मुलांसह रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथे वास्तव्याला होता. शेतात केळी मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. परिसरातील भागात तो मोलमजुरी करत होता. रविवारी २३ एप्रिल रोजी युनूस सायंकाळी ६ वाजता दुचाकी (एमएच १९ बीबी ०३९५) ने सासरी वडगाव येथे गेला होता. तेथून परतत असतांना वाघोदा ते रावेर रस्त्यावर असलेल्या बाळू श्रावण महाजन यांच्या शेतानजीक अज्ञात वाहनाने युनूसच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत युनूस हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनचालक हा वाहन घेवून पसार झाला,ही बाब युनूसचे काका हमीद हसन तडवी यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुतण्याचा मृतदेहपाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. जोरजोरात त्यांना रडू कोसळले. रावेर ग्रामीण रूग्णालयात मृतदेह नेण्यात आला.
याप्रकरणी हमीद तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत युनूसच्या पश्चात आई जैनब तडवी, पत्नी काजल आणि दोन मुले असा परिवार आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.