Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावरखडलेले बहिणाबाई स्मारकाचे अडथळे दूर..!  ग्रामविकास व पर्यटन अंतर्गत १२ कोटींच्या निधीतून...

रखडलेले बहिणाबाई स्मारकाचे अडथळे दूर..!  ग्रामविकास व पर्यटन अंतर्गत १२ कोटींच्या निधीतून असोदा येथील स्मारक पूर्णत्वास येणार…

जळगाव / तुषार वाघुळदे/कार्यकारी संपादक/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव – ” वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी.. नशिबी दगडगोटे, काट्याकुट्याचा धनी,” निसर्ग कन्या ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेले हे शब्द त्यांच्याच स्मारकाबाबत दुर्दैवाने शब्दश: खरे ठरले होते. मात्र आता रखडलेले हे स्मारक लवकरच पूर्णत्वास येणार आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत ग्रामविकास व पर्यटन मंत्रालय विभाग अंतर्गत तब्बल १२ कोटींचा निधी उपलब्ध झाला असल्याने ना.गिरीश महाजन यांनी घेतलेल्या निर्णयाचे साहित्य क्षेत्रातील वर्तुळात कौतुक होत आहे.जळगाव जिल्हा नियोजन बैठकीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा बसविण्यासाठी 1 कोटी रूपये आणि खेडी येथे अद्यावत वारकरी भवन उभारण्यासाठी 7 कोटी रूपयांच्या ठराव करून या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्ह्यातील ६४ ठिकाणांना ‘ क ‘ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली. निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मस्थान असोदा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी ग्रामविकास व पर्यटन विभागाकडून तब्बल *12 कोंटीचा निधी* उपलब्ध करून देण्यात आला आहे.याठिकाणी भव्य स्मारक साकारण्याचे काम बांधकाम विभागाने लवकरात लवकर करावे ,असे निर्देश यावेळी ग्रामविकास,पंचायत राज आणि पर्यटन मंत्री गिरीषजी महाजन यांनी यावेळी दिले.

खान्देशातील लेवा गण बोलीतील आशयपूर्ण कसदार,जीवनाचे तत्वज्ञान सांगणाऱ्या कविता लिहून मराठी साहित्यात अजरामर स्थान मिळवणाऱ्या कृषी कन्या बहिणाबाई चौधरी यांचे असोदा (जि. जळगाव) हे जन्मगाव ( माहेर ) तर जुन्या जळगावमधील चौधरी वाडा येथील सासर होय.जळगावपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेले असोदा येथे बहिणाबाईंचे स्मारक व्हावे, यासाठी तेथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन २००८ पासून लढा सुरू केला आहे ; त्यानंतर पाच वर्षांनी असोदा ग्रामपंचायतीकडून स्मारकासाठी १ हेक्टर १६ आर जागा मिळवण्यात त्यांना यश देखील आले. सन २०१४ मध्ये राज्याचे तत्कालीन कृषी,परिवहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी जिल्हा नियोजन समितीतून या स्मारकासाठी तीन कोटी ६० लाखांचा निधी मंजूर केला. त्यात बहिणाबाईंचा पुतळा, अँम्पी थिएटर, संग्रहालय, ग्रंथालय आणि परिसर सुशोभीकरणाचा समावेश होता. अतिशय देखणे हे स्मारक साकारले जाणार असल्याने साहित्य, कला कला आणि शिक्षण क्षेत्रात आनंद झाला होता व कुतूहल वाटायला लागले होते.

सन २०१५ मध्ये या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. काम पूर्ण करण्याची मुदत दोन वर्षांचीच होती. मात्र, सरकारचे धोरण बदलल्याने नियोजन समितीतील ‘महापुरुषांची स्मारके उभारणे’ हे शीर्षकच बंद झाले. तसेच सत्तेत बदल झाला. पालकमंत्री बदलले.त्यामुळे संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक असलेला ११ कोटी रुपयांचा निधी मिळणे खूपच दुरापास्त झाले होते. तोपर्यंत स्मारक अर्धवट बांधून झाले होते.स्मारकाजवळ काटेरी झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.हे रखडलेले स्मारक मद्यपी यांच्यासाठी ‘ दारूचा अड्डा ‘बनले होते. निधीअभावी स्मारकाच्या आराखड्यात बदल सुद्धा करण्यात आले. स्मारकाची उंची १८ वरून आठ मीटरवर आणण्यात आली. त्याला बहिणाबाई स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी व ग्रामस्थांनी विरोध केला होता.योगायोग असा की ,कवयित्री बहिणाबाई यांची २२ ऑगस्ट म्हणजे नागपंचमीचा जन्मदिवसही होता. आता सकारात्मक निर्णय बैठकीत झाला.या निर्णयाचे खरोखरच लेवा समाज ,लेवा गणबोलीचा प्रसार व प्रचार,संवर्धन होण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेली प्रसिद्ध संस्था ” लेवा गणबोली साहित्य मंडळा “तर्फे आनंद व्यक्त करण्यात आला आहे. “लेवा गणबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष ख्यातनाम इतिहासकार ,संशोधक ,लेवा शब्दकोषकार ,जेष्ठ लेखक डॉ.नि.रा.पाटील ,उपाध्यक्ष व तिसऱ्या लेवा गणबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अरविंदराव नारखेडे ,संमेलनाचे मुख्य आयोजक व लेवा गणबोली साहित्य मंडळाचे संस्थापक सचिव,कवी,कलावंत आणि जेष्ठ पत्रकार तुषार वाघुळदे , सहसचिव तथा जनता शिक्षण मंडळाचे सचिव प्रभातदादा चौधरी ,खजिनदार आणि आकाशवाणी कलावंत किशोरी वाघुळदे, प्रा.संध्या महाजन, चित्रकार लीलाधर कोल्हे,संजय पाटील,वीणा नारखेडे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच विनोद इंगळे, प्रा.कमल पाटील,किसन वराडे,कविता लोखंडे, संध्या भोळे, प्रा.विनय पाटील, अभिनेत्री सुवर्णलता पाटील , तृप्ती पाटील , प्रा.सिंधू भंगाळे,वंदना नेमाडे, रवी पाटील,ज्योती राणे,प्रा.व.पु.होले, कलावंत राजेंद्र जावळे, लीलाताई गाजरे,शारदा चौधरी, डॉ.प्रणव कोलते ,पुष्पा कोल्हे ,प्रा.अरुण पाटील, साधना लोखंडे, डॉ.अतुल सरोदे ,प्रा.अ. फ. भालेराव, गणेश जावळे,पंकज पाटील , डॉ.मिलिंद पाटील, हर्षल चौधरी,पराग पाटील , हर्षल चौधरी आणि शुभांगी सरोदे,प्रल्हाद कोलते यांच्यासह अनेकांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या