Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorizedलक्ष्मण पुजारी दाऊत आतार यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव

लक्ष्मण पुजारी दाऊत आतार यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव

सोलापूर /जिल्हा प्रतिनिधी/ खंडेराव पाटील/ पोलीस दक्षता लाईव्ह:- भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संचलित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला सेटलमेंट सोलापूर या प्रशालेतील ज्येष्ठ सहशिक्षक लक्ष्मण पुजारी आणि सेवक दाउत आतार यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू गायकवाड यांच्या हस्ते लक्ष्मण पुजारी व दाऊत आतार यांचा संपूर्ण पोशाखाचा आहेर आणि पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक विष्णू गायकवाड यांनी आपल्या भाषणात सेवानिवृत्त जेष्ठ सहशिक्षक लक्ष्मण पुजारी व सेवक दाउत आतार यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख करताना म्हणाले, दोघेंही मेहनती व कष्टाळू असल्याने मी शाळेत आमूलाग्र बदल करून प्रगती करू शकलो. संकटावर मात करण्याची क्षमता दोघांमध्ये दिसून आली, असे गौरवोद्गार काढले. यानंतर प्रशालेतील सहशिक्षक रवी देवकर म्हणाले,ज्या शाळेमध्ये लक्ष्मण पुजारी आणि दाऊत आतार यांनी काम केले त्याच शाळेला दोघांनी मिळून तब्बल एक लाख रुपयांची देणगी देऊन त्यांनी उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात एक लक्षवेधी असा आदर्श ठेवला आहे. यासाठी केवळ प्रशालेतील शिक्षकांनी नव्हे तर समस्त शिक्षणप्रेमी लोकांनी या दोघांना धन्यवाद दिले पाहिजे. अशा दानशूर व्यक्ती, शाळेसाठी समाजासाठी भूषण ठरतात. इतर क्षेत्राला देणगी देण्यापेक्षा शिक्षण क्षेत्राला देणगी देणे म्हणजे मानव कल्याणाचा व देशाच्या विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी आहे. त्यामुळे शिक्षणाला दिलेली देणगी सर्वोत्कृष्ट आहे,असे प्रतिपादन केले.
लक्ष्मण पुजारी आणि दाऊद आतार यांनी गेल्या 32 वर्षांचा प्रदीर्घ कालखंड शाळेच्या अध्यापन आणि सेवेत व्यतीत करून शाळेचा नावलौकिक वाढवल्याबद्दल दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील, असे प्रतिपादन महादेव यादव यांनी केले.
प्रशालेतील शिक्षक व कर्मचारी यांनी निवृत्त होणारे शिक्षक व कर्मचारी यांच्या कार्यांची स्फूर्ती घेऊन कामकाज करण्याचे आवाहन करीत या दोघांचेही योगदान सदैव स्मरणात राहील असे साहेबराव शिंदे म्हणाले. सेवेत असताना चाकोरीबद्ध जीवन आपण जगत असतो. निवृत्तीनंतरच्या काळांमध्ये दोघांनीही जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबास, समाजास देऊन आपले आरोग्य, आहार- विहाराकडे लक्ष द्यावे, असा सल्ला किरण गायकवाड यांनी यावेळी दिला. प्रशालेतील सेवक शाहूराजे सावंत यांनी दोघांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देत त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.सेवानिवृत्तीनिमित्त सत्काराला उत्तर देताना लक्ष्मण पुजारी म्हणाले, १ जून १९९६ या दिवशी एक रुपयाही न घेता, माझी क्षमता पाहून, माझ्यासारख्या गरीब, होतकरू उमेदवाराला नोकरी देणारे प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू गायकवाड हे आहेत असे सांगत संस्थेचे विश्वस्त, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रेमळपणा विषयी कृतज्ञता व्यक्त करीत, संस्थेने माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती मी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे असे सांगत सर्वांचे आभार मानले. यानंतर सेवक दाऊत आतार म्हणाले, शाळेमध्ये जास्तीत जास्त चांगले काम केल्याचे समाधान वाटते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला ही संख्यात्मक आणि गुणात्मक ज्ञान देणारे आदर्श शाळा असून विद्यार्थी संगणक ज्ञानाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करीत आहेत. याचा मला आनंद वाटतो. प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आजपर्यंत प्रशालेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे ऋण मी कधीही विसरणार नाही, असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सत्कार समयी दोघांच्याही एका डोळ्यात स्मित हास्य तर दुसऱ्या डोळ्यात आसवांचे रहस्य होते. निरोप देणे- घेणे अपरिहार्य असते. निरोप समारंभ लहान असो वा मोठा असो हे महत्त्वाचे नसते तर हृदय भेदून निघणारा असावा, हे आम्हांस दिसून आले असे मनोगत उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. हा समारंभ सुरू असताना उपस्थित विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह पालकांचाही कंठ दाटून आला होता. या समारंभाचे सूत्रसंचालन रवी देवकर यांनी केले तर साहेबराव शिंदे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या