Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याशेतकऱ्यांना आता कांदाचाळसाठी मिळणार १ लाख ६० हजार अनुदान

शेतकऱ्यांना आता कांदाचाळसाठी मिळणार १ लाख ६० हजार अनुदान

मुंबई/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी १ लाख ६० हजार ३६७ अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रांगडा हंगामातील कांदा सुकवून साठविला जाऊ शकतो. परंतु कांदा साठविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तयार केलेले गोदाम उपलब्ध नसल्याने खरीप हंगामातील कांदा काढला की लगेच विकावा लागतो. कांद्याचे उत्पादन ठराविक हंगामात येते. मागणी मात्र वर्षभर सारखीच असते. कांद्याचे पीक निघाल्यावर मागणी नसल्यामुळे बाजारात कांद्याचा भाव पडतो. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे कांद्याच्या बाजार भावातील चढ-उतार होण्यापासून सुरक्षा, स्थानिक बाजारपेठेत योग्य दरात पुरवठा आणि निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे असल्याचे मंत्री भुमरे यांनी सांगितले.

कांदा ही एक जीवंत वस्तू आहे. तिचे मंदपणे श्वसन चालू असते. तसेच पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते. त्यामुळे योग्य प्रकारे साठवण न केल्यास कांद्यास ४५-६० टक्क्यांपर्यंत
नुकसान होऊ शकते. हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इ. कारणांमुळे होते. त्यामुळे कांद्याचे कमीतकमी नुकसान होण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कांदाचाळीच्या माध्यमातून कांदा पिकाची साठवणूक आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मनरेगा अंतर्गत एकूण १,६०,३६७ रूपये मिळणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या