मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- ज्येष्ठ भाजपा नेते आणि राज्याचे वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमित्त रविवारी दि. 30 जुलै रोजी येथील सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरातील संत गाडगेबाबा धर्मशाळेत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत अन्नछत्र उपक्रमाचा शुभारंभ झाला.मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमित्त चंद्रपूर येथील माता कन्यका सेवा संस्थेच्या वतीने पुढील महिनाभर हे अन्नछत्र चालविण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी सर्वप्रथम वैराग्यमूर्ती संत श्री गाडगेबाबांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले; सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी नितीन कुलकर्णी, आरोग्य समन्वयक सागर खडसे, मयूर चव्हाण आदींनी या उपक्रमाची भूमिका विषद केली. वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर वंचित आणि गरजू लोकांची सेवा करुन भुकेल्याना अन्न, आजारी आणि पंगू लोकांवर औषधोपचार करण्याचा संदेश देत माणसांत देव शोधून गरिबांची सेवा केली; सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यशैलीत सेवा, सहयोग आणि समर्पण या त्रिसूत्रीचा समावेश असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांचा समाज प्रबोधनाचा वसा पुढे नेण्याचा प्रयत्न सामाजिक आणि राजकीय कार्यातून मुनगंटीवार करीत आहेत असे नितीन कुलकर्णी यांनी सांगितले.
संत गाडगेबाबा मिशन संस्थेच्या वतीने श्री अमोल ठाकूर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा मांडून मुनगंटीवार यांच्या योगदानाचे कौतुक केले. रुग्णसेवा आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वोपरी मदत करणारे सुधीर मुनगंटीवार हे मदतीसाठी सतत तयार असतात असा उल्लेख करुन त्यांचे व माता कन्यका संस्थेचे आभार मानले. उपस्थित असलेल्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी माता कन्यका संस्थेचे आभार मानून सुधीर मुनगंटीवार यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.