जळगाव/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात चार दिवसांपासून आलेली उष्णतेची लाट कायम आहे. जिल्ह्यात शुक्रवारी तापमानाचा पारा ४४.९ अंशांवर आला आहे.मे अखेरपर्यंत तापमान ४७ डिग्री सेल्सिअस पर्यन्त जाण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.भुसावळचे तापमान ४५.०७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. लग्नाची तिथ कडक असल्याने अनेकांना रणरणत्या उन्हाचा चटका बसला.अंगाची लाहीलाही होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे दिवसाचे अनेक कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. मात्र, रावेर येथील धार्मिक कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी आलेल्या महिलेचा वरणगाव येथे अचानक मृत्यू झाला. त्यांना उष्माघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नम्रता दिनेश चौधरी (वय ३९ ) असे या महिलेचे नाव आहे. दरम्यान अमळनेर येथे सूर्य आग ओकत आहे. नागरिक मे हिटमध्ये हैराण झाले आहेत. त्यात अमळनेरात ऐका विवाहित महिलेचा उष्माघाताने बळी गेल्याची घटना दि.12 रोजी तांबेपुरा भागात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रुपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय 33 ) ही महिला अमरावती येथे विवाह सोहळ्यानिमित्त गेली होती दि 11 रोजी सायंकाळी ती रेल्वेने परत आल्यानंतर ऊन लागल्याने तिला अचानक मळमळ व उलट्या सुरू झाल्या, यामुळे तिच्या पतीने तांबेपुरा येथेच एका खाजगी डॉक्टराना दाखवले असता त्यांनी ऊन लागल्याचे सांगत गोळ्या औषधे देऊन प्राथमिक उपचार केले. थोडावेळ महिलेला बरेही वाटले मात्र सकाळी उठल्यानंतर पुन्हा उलट्या मळमळ चक्कर सुरू झाल्याने घरच्यांनी सकाळी 10.30 वाजता तात्काळ रिक्षा करून शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अमळनेर ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे यांनी महिलेचे शवविच्छेदन केले. याबाबत अमळनेर पोलिसात महिलेचे दिर दीपक राजपूत यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. मात्र सदर मृत्यू उष्माघातानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर महिलेच्या पश्चात पती, सासू सासरे, दिर असा परिवार आहे. त्याचप्रमाणे पाचोरा तालुक्यातील सातगाव येथे सुद्धा ६२ वर्षीय रमाकांत पाटील यांना चक्कर व उलट्या आल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भुसावळ येथे ही काल लग्न समारंभात दोन जणांना उन्हाचा चटका लागल्याने आणि मळमळ झाल्याने उपचारार्थ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ.महाजन यांनी प्रतिनिधीस सांगितले.
सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच असल्याने असह्य होत आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत चार मृत्यू उष्माघाताने झाले आहेत.
मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी 35 ते 40 अंश से. असलेले तापमान आज 45 पार केले आहे.पुढील प्रत्येक ५ वर्षात ४५ ते ५० नंतर ६० अंश से. पर्यंत जाईल तेव्हा अशी रडायची वेळ येईल की, आहे ती झाडेही सुकतील.आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही.