Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमस्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यांची गोळ्या झाडून हत्या..! पिंपरखेडा घाटातील घटना...

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या शहराध्यांची गोळ्या झाडून हत्या..! पिंपरखेडा घाटातील घटना…

धुळे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- धुळे येथे चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे धुळे शहराध्यक्ष यशवंत बागुल (वय ४४, रा. मिलिंद सोसायटी, साक्री रोड, धुळे) यांचा दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून तसेच चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.

याप्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.
धुळे पोलिसांनी सांगितले की, धुळे तालुक्यातील उभंड नांद्रे रस्त्यावर पिंपरखेडा घाटात गुरुवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास हा निर्घृण खून झाला. यशवंत सुरेश बागुल यांची धुळे तालुक्यातील उभंड नांद्रे शिवारात शेती आहे. शेतीसाठी गावात मजूर मिळत नसल्याने यशवंत बागुल त्यांची पत्नी आणि मुले मामांच्या घरी मुक्कामी थांबले होते. यशवंत बागुल हे त्यांच्या मामाचा मुलगा पंकज राजेंद्र मोहिते यांच्या मोटरसायकलीवर बसून सायंकाळी सात वाजता शेजारच्या पिंपरखेडा गावात मजुरांच्या शोधासाठी गेले होते. दोघेजण पिंपरखेड येथून उभंड नांद्रे गावाकडे परत येत असताना पिंपरखेड घाटामध्ये मोटरसायकलीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी ‘अण्णा थांब’ असा आवाज देऊन थांबविले. त्यानंतर यशवंत बागुल आणि ते दोघे अनोळखी व्यक्ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन गप्पा मारत उभे होते.
काही वेळातच एकाने कमरेला लावलेले गावठी पिस्तूल काढले आणि थेट गोळी झाडली. त्यामुळे यशवंत बागुल यांच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर दुसऱ्याने चाकूने त्यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले. हा भयावह प्रसंग पाहून पंकज मोहिते हा मोटरसायकलीने गावात निघून आला आणि घडलेली घटना त्याने घरी सांगितली. त्यानंतर सर्व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच पोलिसही लागलीच घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांनी पोलिसांच्या मदतीने यशवंत बागुल यांना बेशुद्ध अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री एक वाजेच्या सुमाराला डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मयत घोषित केले. दरम्यान या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. नेमका खून का करण्यात आला याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या