जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळसह जळगाव शहरात पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढलेले चित्र दिसत आहे.हळदीच्या कार्यक्रमात पुतण्यामुळे वाद झाल्याचा राग मनात ठेवून १५ ते २० जणांनी जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथील काकाच्या घरावर दगडफेक करत घरात घुसून तलवार व चॉपरचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात २० जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील कुसूंबा हे गाव अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आहे. येथे पंडीत शेनफडू कोळी वय ४३ हे वास्तव्यास आहेत. पंडीत कोळी यांचा पुतण्या गणेश कोळी याच्यामुळे ८ मे रोजी हळदीच्या कार्यक्रमात वाद झाल्याचा गैरसमज तसेच राग मनात ठेवून ९ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील जैनाबाद येथील धिरज कोळी, छोटू कोळी, अतुल पाटील यांच्यासह १५ ते २० जण पंडीत कोळी यांच्या घरी आले,आणि जोरजोराने ओरडू लागले. त्यांनी पंडीत कोळी यांच्या घरावर दगडफेक केली, तसेच घरात घुसून तलवार व चॉपरचा धाक दाखवून शिवीगाळ करत तुम्हाला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी पंडीत कोळी यांना दिली, यावेळी शेजारी पाजारच्या लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. याच दरम्यान संबंधितांनी कोळी यांचा पुतण्या गणेश कोळी यास फोनवरुन गावात येवून मारण्याची धमकी सुध्दा दिली. याबाबत दुसऱ्या दिवशी बुधवारी पंडीत कोळी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन धिरज कोळी, छोटू कोळी, अतुल पाटील यांच्यासह १५ ते २० जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक श्री.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.