जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात इयत्ता 10वी व 12वीच्या पुरवणी परीक्षा 24 जून ते 16 जुलै या कालावधीत होणार आहेत. या परीक्षांच्या प्रभावी आयोजनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक घेण्यात आली.
या बैठकीत शिक्षण विभागाच्या अधिकारी व संबंधित विभागांनी परीक्षेच्या तयारीचा आढावा सादर केला. परीक्षेसाठी लागणाऱ्या परीक्षा केंद्रांची आखणी, सुरक्षेची व्यवस्था, पर्यवेक्षकांची नियुक्ती, CCTV यंत्रणा आणि विद्यार्थ्यांसाठी सुविधा यावर सविस्तर चर्चा झाली.
कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षा नकलरहित पार पडावी यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, सर्व संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दक्षता समितीची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती.
परीक्षेचे तपशील पुढीलप्रमाणे:
इ. 10वी: 698 विद्यार्थी | 14 परीक्षा केंद्रे | 8 परिरक्षक केंद्रे
इ. 12वी: 509 विद्यार्थी | 8 परीक्षा केंद्रे | 8 परिरक्षक केंद्रे
एकूण: 1,207 विद्यार्थी | 22 परीक्षा केंद्रे | 16 परिरक्षक केंद्रे
जिल्हाधिकारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या असून, परीक्षा शांततामय व पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले.