रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकाला त्याच्या खासगी पंटरसह लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) पथकाने रंगेहात अटक केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.रावेर तालुक्यातील खानापूर परिसरात मंगळवारी रात्री एसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक विजय पाटील व त्यांचा खासगी पंटर भास्कर चंदनकर यांना अटक करण्यात आली.
यापूर्वी तक्रारदाराच्या वडिलांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली होती. या प्रकरणात पुढील कारवाई टाळण्यासाठी विजय पाटील यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.ठरल्याप्रमाणे खानापूर येथे लाचेची रक्कम थेट स्वीकारण्याऐवजी ती खासगी पंटर भास्कर चंदनकर याच्याकडे देण्याचे सांगण्यात आले होते. तक्रारदाराकडून दहा हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने चंदनकर याला रंगेहात पकडले. त्यानंतर विजय पाटील यांनाही ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. विजय पाटील हे रावेर तालुक्यातील आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत होते. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

