चाळीसगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- चाळीसगावात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने मोठी कारवाई करत २५ हजारांची लाच घेताना महिला तलाठीसह तीन जणांना रंगेहात अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे चाळीसगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारा उताऱ्यातील कालबाह्य नोंद कमी करण्यासाठी लाचेची मागणी
तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर मौजे पाथरजे (ता. चाळीसगाव) येथील वडिलोपार्जित शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर ईतर हक्कातील जुनी, कालबाह्य नोंद कमी करण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदाराने महिला तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहिम (वय २९, रा. हरी ओम नगर, प्लॉट क्र. ९, चाळीसगाव) यांची भेट घेतली. त्यांनी हे काम रोजगार सेवक वडिलाल रोहिदास पवार (वय ४०, रा. लोंजे, ता. चाळीसगाव) यांच्याकडून करून घ्या, असे सांगून लाचेची अप्रत्यक्ष मागणी केली.
रोजगार सेवकाकडून लाचेची थेट मागणी
त्यानंतर तक्रारदाराने १४ जुलै रोजी रोजगार सेवकाची भेट घेतली असता त्यांनी ‘तुमचे काम उद्या सांगतो’ असे सांगितले. १७ जुलै रोजी पुन्हा भेटीनंतर तलाठी मोमीन यांनी काम करून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली. यावेळी खाजगी व्यक्ती दादा बाबू जाधव (वय ४०, रा. लोंजे, ता. चाळीसगाव) याने देखील तक्रारदारास लाच देण्यासाठी मानसिक दबाव आणला.
३० जुलैला सापळा; एसीबीचे यशस्वी ऑपरेशन
तक्रारदाराने लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केल्यानंतर ३० जुलै रोजी एसीबीने सापळा रचत रोजगार सेवक पवार यांना तलाठी कार्यालयाबाहेर लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. त्यानंतर तलाठी मोमीन आणि खाजगी व्यक्ती दादा जाधव यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या. तिघांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
चाळीसगावमध्ये खळबळ; शेतकऱ्यांमध्ये संताप
या कारवाईमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, तर प्रशासनातील काही मंडळींमध्ये धडकी भरली आहे.