जळगाव/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- भागपूर, येथे 26 नोव्हेंबर 2024 रोजी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वराज्य जननी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यच्या वतीने एक विशेष मानवतावादी उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत गरीब आणि गरजू जनतेमध्ये ब्लॅंकेट व खाऊ वाटपाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
भागपूर गावात झालेल्या या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहित येवले व सदस्य दुर्गेश होले यांसह गावातील मान्यवर, ग्रामस्थ आणि कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक आधारस्तंभ समाजसेवक गणेश भाऊ चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर ब्लॅंकेट आणि खाऊ वाटप सुरू झाले. थंडीच्या हंगामात अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे गरजू जनतेला मोठा आधार मिळत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. गावकऱ्यांनी या उपक्रमासाठी स्वराज्य जननी प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार मानले आणि भविष्यातही असेच समाजोपयोगी उपक्रम राबवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहित येवले यांनी सांगितले की, “26/11 च्या शहिदांच्या त्यागामुळे आपण सुरक्षित आहोत. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही. या उपक्रमाद्वारे त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा हा आमचा एक प्रयत्न आहे.”
हा कार्यक्रम स्थानिक पातळीवर अत्यंत यशस्वी ठरला असून समाजसेवेचा हा आदर्श पुढेही जोपासण्याचा निर्धार प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे.