जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव तालुका पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात आरोपी क्रमांक 1 जिजाबराव अभिमन्यु पाटील (वय 48, रा. अमळनेर) आणि आरोपी क्र. 2 विजय रंगराव निकम (वय 46, रा. अमळनेर) यांच्यावर मयत स्नेहलता अनंत चुंबळे यांना फसवून, खून करून, तिचे 30 लाख रुपये हडप केल्याचा आरोप आहे. सदर गुन्हा 2 सप्टेंबर 2024 रोजी दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपींनी गुन्हा कबूल करत मयताजवळील 30 लाखांची रक्कम लालसेपोटी घेतल्याचे उघड झाले. ही रक्कम जप्त करून ती जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली होती.
मयताचे नातेवाईक व फिर्यादी समीर ऊर्फ सौरभ संजय देखमुख (वय 28) व संजय नानासाहेब देखमुख (वय 61, रा. खोटेनगर, जळगाव) यांनी न्यायालयात रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्या अनुषंगाने मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव यांनी दिनांक 19 जून रोजी सदर रक्कम अर्जदाराच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार 30 लाख रुपयांची रक्कम दिनांक 23 जून रोजी मा. पोलीस अधीक्षक, जळगाव श्री. महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत फिर्यादीच्या ताब्यात देण्यात आली.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक, मा. अपर पोलीस अधीक्षक, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, लेखनिक हवालदार प्रविणा जाधव, पो.ह. प्रविण पाटील आणि पो.कॉ. गणेश पाटील यांनी केली.