Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeखेळ जगत४२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेत जळगावच्या निकिता पवारचे सुवर्ण यश!

४२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांडो स्पर्धेत जळगावच्या निकिता पवारचे सुवर्ण यश!

जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूने दाखवली दमदार कामगिरी ; महाराष्ट्र संघासाठी राष्ट्रीय शालेय स्पर्धेत निवड

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- क्रीडा क्षेत्रात जळगाव जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा उजळविणारी कामगिरी करत, जैन स्पोर्ट्स अकॅडमी व जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनची कु. निकिता दिलीप पवार हिने ४२ व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांडो (क्युरोगी) स्पर्धेत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. ही स्पर्धा दिनांक ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ दरम्यान राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू येथे पार पडली.५५ किलो वजनगटातील स्पर्धेत निकिताने अत्यंत प्रभावी कामगिरी सादर करत प्रथम फेरीत कर्नाटकच्या मोनिषा एस., दुसऱ्या फेरीत केरळच्या अवंतिका व्ही., तिसऱ्या फेरीत मध्य प्रदेशच्या अस्मी भारती, तर अंतिम फेरीत आसामच्या व्हिएना हजारिका हिला पराभूत करत सुवर्णपदक निश्चित केले.

निकिता पवार ही मागील चार वर्षांपासून नियमित सरावात गुंतलेली एक मेहनती व जिद्दी खेळाडू असून तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर व मुख्य प्रशिक्षक अजित घारगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित म्हणून आता ती ६९ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांडो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवडली गेली आहे. ही स्पर्धा जम्मू-काश्मीर येथे होणार असून निकिता महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.तिच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अतुल भाऊ जैन, उपाध्यक्ष श्री. ललित पाटील, खजिनदार श्री. सुरेश खैरनार, सचिव श्री. अजित घारगे, सहसचिव श्री. रविंद्र धर्माधिकारी, तसेच सदस्य श्री. नरेंद्र महाजन, श्री. कृष्णकुमार तायडे, श्री. महेश घारगे, श्री. सौरभ चौबे यांच्यासह जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

निकिताच्या सुवर्ण कामगिरीमुळे जळगाव जिल्ह्यातील युवा खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून तिने ‘जिद्द आणि शिस्त हीच खरी क्रीडामंत्र’ याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या