जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मोहराळा गावात पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह शुक्रवारी शेतातील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृत तरुणाचे नाव साहिल शब्बीर तडवी (वय १९) असून, कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेनंतर मोहराळा गावात तणाव निर्माण झाला असून संतप्त जमावाने एका कुटुंबाच्या वाहनाची तोडफोड केली आहे. साहिल १६ जूनपासून बेपत्ता होता. नातेवाईक व मित्रांनी शोध घेतला, पण तो आढळून आला नव्हता. अखेर शुक्रवार, २१ जून रोजी वड्री रस्त्यावरील शेत विहिरीत त्याचा मृतदेह सापडला.
तोडफोड आणि पोलिसांचा बंदोबस्त
मृतदेहाची माहिती समजताच मोहराळा येथील गावकऱ्यांमध्ये संताप उसळला. संशयित कुटुंबावर संशय घेत त्यांच्या घरासमोरील चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.
इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी
मृतदेह रात्री ८.१५ वाजता विहिरीतून बाहेर काढण्यात आला. कुटुंबियांनी इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केली असून, यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलवण्यात आला आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
मोहराळा गावात हवालदार नीलेश चौधरी, मोहन तायडे, अल्लाउद्दीन तडवी, भरत कोळी, सागर कोळी यांच्यासह पोलीस बंदोबस्त तैनात आहे. पुढील तपास शवविच्छेदन व पोलिस चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.