Friday, February 27, 2026
police dakshta logo
Homeक्राईमचालत्या दुचाकी अडवून ८ लाखांची बॅग लुटणाऱ्या ७ जणांना अटक ; मुख्य...

चालत्या दुचाकी अडवून ८ लाखांची बॅग लुटणाऱ्या ७ जणांना अटक ; मुख्य आरोपी फरार

रावेर गुन्हे शोध पथकाची कारवाई ; ३.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- बहाणपुर येथील मसाला व्यापाऱ्याची वसुलीची रक्कम असलेली बॅग चालत्या दुचाकीवरून हिसकावून नेणाऱ्या सात संशयित आरोपींना रावेर गुन्हे शोध पथकाने अटक केली असून, मुख्य आरोपी फरार आहे. या प्रकरणी ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दि. ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी बुन्हाणपुर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्मानी यांनी त्यांच्या दुकानातील कर्मचारी गौरव वाघ व तौफिक तेली यांना सावदा, फैजपूर व रावेर येथे विक्री केलेल्या मालाची वसुली करण्यासाठी पाठविले होते. वसुली करून परत येत असताना खानापूर आरटीओ कॅनॉलजवळ रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास ८ ते ९ इसमांनी दुचाकी अडवून पैशांनी भरलेली सुमारे ८ लाख रुपयांची बॅग हिसकावून नेल्याची माहिती गौरव व तौफिक यांनी फिर्यादीस दूरध्वनीवरून दिली.या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात दि. ०७/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपास सुरू केला. रात्रीची वेळ असल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. तसेच घटनास्थळी कॅमेरे नसल्याने आरोपींच्या पळवाटेबाबत स्पष्टता नव्हती.तपासादरम्यान रावेर, सावदा व फैजपूर परिसरातील तब्बल ६७ सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले; मात्र ठोस धागेदोरे मिळत नव्हते.दरम्यान, फिर्यादींच्या दिवसभराच्या हालचालींवर लक्ष ठेवूनच गुन्हा केल्याचा संशय व्यक्त होत होता. त्यानुसार दुकानातील कर्मचाऱ्यांनी लुटीचा बनाव तर केला नाही ना, या अनुषंगानेही तपास करण्यात आला; परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार फारुख शेख रईस (वय १९), अताउल्लाह खान दाऊद खान उर्फ सोनू, शेख सईद शेख कादर उर्फ सुपडू, शेख समीर शेख कलीम उर्फ चिकू, राहील खान दाऊद खान, रहेमान खान अय्युब खान उर्फ मुन्या व अक्रम खान इस्माईल खान (सर्व रा. बंडू चौक, रावेर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार सातही आरोपींना अटक करण्यात आली आहे.या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेख हसन शेख अफजल उर्फ हसन फावड्या (रा. रुस्तम चौक, रावेर) हा सुगावा लागताच फरार झाला असून त्याच्यावर सावेर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती असून त्याचा शोध सुरू आहे.आरोपींकडून ९५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली व २ लाख ५५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. २६/०२/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर (फैजपूर विभाग) व अण्णासाहेब घोलप (चोपडा विभाग, अतिरिक्त कार्यभार) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने केली. सायबर पोलीस ठाण्याचे गौरव पाटील व मिलिंद जाधव यांनी तांत्रिक मदत पुरविली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या