Friday, February 27, 2026
police dakshta logo
Homeक्राईम८ वर्षांनंतर अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध ; AHTU पथकाची उल्लेखनीय कामगिरी

८ वर्षांनंतर अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध ; AHTU पथकाची उल्लेखनीय कामगिरी

एमआयडीसी पोलीस ठाण्यातील २०१८ मधील गुन्ह्यातील पीडितेचा होळीच्या बाजारातून शोध

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- सन २०१८ मध्ये अपहरण झालेल्या ९ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तब्बल आठ वर्षांनंतर शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) उल्लेखनीय यश मिळविले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, गोपनीय माहितीदारांचे जाळे आणि सातत्यपूर्ण तपास यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.जळगाव जिल्ह्यात चार महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लोटूनही अपहृत मुले-मुलींचा शोध न लागलेल्या प्रकरणांचा आढावा मा. पोलीस अधीक्षक सो. महेश्वर रेड्डी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक नखाते व पोलीस उपअधीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. त्यानुसार AHTUचे सपोनि हरीदास बोचरे, पोउपनिरी दिनेश बडगुजर व पथकातील अधिकारी-अंमलदार हरविलेल्या मुला-मुलींचा शोध घेत होते.आढाव्यात आदिवासी समाजातील अनेक मुला-मुलींची प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आदिवासी मेळावे, यात्रा, उत्सव व आठवडे बाजार या ठिकाणी गोपनीय माहितीदारांमार्फत शोधमोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, होळी निमित्त कर्जाणे (ता. चोपडा) येथे भरलेल्या भोंगर्या बाजारात सुमारे १५ ते १६ वर्षांची एक मुलगी पालकांविना फिरत असल्याची माहिती AHTU पथकातील पोहेका दिपक पाटील यांना त्यांच्या गोपनीय माहितीदारामार्फत मिळाली. संबंधित मुलीस स्वतःचे नाव व पत्ता सांगता येत नसल्याचेही समोर आले.सदर मुलीचा फोटो मागवून तपासातील नोंदींशी पडताळणी करण्यात आली. सुरुवातीला फोटो जुळत नसल्याने पोउपनिरी बडगुजर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रलंबित अपहरण प्रकरणांतील मुली सध्या कशा दिसत असतील याचे संभाव्य फोटो तयार करून त्यांची तुलना केली. त्यावेळी एमआयडीसी पोलीस ठाणे भाग ५, गु.र.नं. ३५९/२०१८, भादंवि कलम ३६३, ३७० मधील ९ वर्षीय अपहृत मुलीच्या चेहऱ्याशी साम्य आढळले.यानंतर स.पो.नि. हरीदास बोचरे यांनी वरिष्ठांच्या परवानगीने पोउपनिरी बडगुजर, स.फो. विठ्ठल फुसे, पो.हे.का. दिपक पाटील,पो.हे.का मनिषा पाटील, पो.हे.का. किरण धनगर व स.फो. सलीम शेख यांचे पथक तात्काळ कर्जाणे येथे रवाना केले. गोपनीय पद्धतीने व तांत्रिक साधनांच्या साहाय्याने संबंधित मुलीची खात्री करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तिला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

सदर कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो. महेश्वर रेड्डी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नखाते व पोलीस उपअधीक्षक श्री. अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU पथकाने पार पाडली. सन २०१८ मध्ये अपहृत झालेल्या ९ वर्षीय मुलीचा आठ वर्षांनंतर शोध लावून पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या