ढाके कुटुंबीयांनी ठेवले देहदानाप्रती जागरूकतेचे उदाहरण..!
नशिराबाद/तुषार वाघुळदे/ कार्यकारी संपादक/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील 80 व्या वर्षी वृद्धेचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे शरीर मेडिकल कॉलेजला दान देण्यात आले. त्यांच्या इच्छेनुसार ढाके(साळवेकर) कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला.
मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मृत शरीराची आवश्यकता पडते. एखाद्या व्यक्तीनं देहदान केल्यास त्या शरीरावर अभ्यास करता येतो. पण, देहदानाची संख्या एवढ्यात रोडावली आहे ,असे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे.जळगाव जिल्हा पोलीस दलाचे नागरी हक्क संरक्षण विभागात कार्यरत असलेले प्रवीण वसंत ढाके यांच्या मातोश्री गं.भा.विमल वसंत ढाके यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले.ढाके कुटुंब हे नशिराबाद येथील मुक्तेश्वर नगर येथे वास्तव्यास आहेत. गं.भा.विमल वसंत ढाके यांनी मृत्यूच्या जवळपास पाच ते सहा वर्षांपूर्वीच मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला होता. त्या नेहमी आपल्या सुनेशी (उर्मिला ) व मुलगा (प्रवीण ) यांच्याशी याबाबत चर्चा करीत होते. त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते की, अंत्यसंस्कारावर पैसा खर्च करायचा नाही.अंत्यसंस्काराविना मृत्यूनंतर माझे शरीर रुग्णालयाला दान देण्यात यावे. त्यानुसार कुटुंबीयांनी मृत शरीर भुसावळ रोडवर असलेल्या डॉ.उल्हास पाटील रुग्णालय व मेडिकल कॉलेजला दान दिले. मेडिकल कॉलेजची शववाहिका आली, त्यांनी चांगले सहकार्य केले. शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वनही केले.विमल ढाके यांचा देहदानाचा संकल्प पूर्ण करायचा होता. विमलबाई यांना अध्यात्मिक व समाजसेवेत विशेष रुची होती.त्यांनी सुरवातीपासून खूप काबाडकष्ट केलेत.
ढाके कुटुंबीयांनी देहदानाप्रती जागरूकतेचे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.
‘देहदान हेच श्रेष्ठदान’ असे जनजागृती करणारे वाक्य आपल्याला अनेक वेळा वाचनात येतात. मात्र, हा संकल्प करताना कुठली प्रक्रिया अवलंबली जाते, याची फारशी माहिती इच्छुकांना मिळत नाही. मरणोत्तर देहदानासाठी संबंधित संस्था किंवा मेडिकल कॉलेजच्या विनंती अर्जानंतर स्वेच्छापत्र तयार होते आणि ही प्रक्रिया सुरू होते. डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये देहदान समिती स्थापन करण्यात आली आहे.राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान फारसे होत नाही. याकरिता अवयवदान जनजागृतीची खूप गरज आहे.वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांना जीवनदान मिळत असते.
अवयव दान केल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. परंपरेला फाटा देत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापेक्षा आपला देह शरीररचना शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामी यावा, या उद्देशाने अनेकजण देहदान करतात.देहाचा सखोल अभ्यास करत,वैद्यकीय शिक्षण घेत मोठे डॉक्टर झाले आहेत,आणि ‘ रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ‘…करत आहेत.
अनेकांनी अवयव दान करतांना केवळ “माणुसकी धर्म” पाळला आहे आणि महान आणि पुण्याचे कार्य केले आहे, ही बाब निश्चितच भूषणावह आहे.
(अंत्यसंस्कार) डावलून मेडिकल कॉलेजच्या शरीररचना शास्त्र विभागाला अध्ययन व अनुसंधान करण्यासाठी दात्याच्या स्वेच्छेनुसार मरणोत्तर देहदान करणे, ही निश्चितच मोलाची संकल्पना आहे, यात शंकाच नाही. जीवित अवस्थेत दात्याने जेव्हा मरणोत्तर देहदानाची इच्छा एखाद्या स्वेच्छापत्राद्वारे, देहदानाशी संबंधित संस्थेच्या अर्जाद्वारे अथवा विशिष्ट मेडिकल कॉलेजच्या विनंती अर्जाद्वारे व्यक्त केली असते.आज आपण बघतो की ,दिवसेंदिवस वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही वाढत चालली आहे.
‘मरणोत्तर देहदान’ हे पाप अथवा धर्माच्या विरुद्ध केलेले कर्म नाही. ते एक महान पुण्याचे कार्य आहे. पुराणात, दधिची ऋषींनी स्वतःच्या पार्थिवाचे देहदान देवांना केले.देवांनी त्यांच्या मणक्याचे अस्त्र तयार करून त्याद्वारे दैत्यांचा संहार करीत सर्व देवांचे दैत्यांच्या अत्याचारापासून रक्षण केल्याची आख्यायिका आहे.त्यामुळे यादृष्टीने सकारात्मक विचार होण्याची गरज आहे. देहदानासाठी समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे. समाजात एक आदर्श निर्माण व्हावा अशी अपेक्षा आहे.