भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- धर्म, अध्यात्म आणि संस्कार यांची सांगड घालणारी एक प्रेरणादायी घटना भुसावळातील चक्रधर नगर येथील जैन स्थानक गादिया पौषध शाला येथे घडली. श्रुतधर आचार्य प.पू. प्रकाश मुनीजी म.सा. यांच्या आज्ञानुवर्ती जैन साध्वी खुशालीजी म.सा. आदी ठाणा चार यांच्या चातुर्मास प्रवचनातून प्रेरणा घेऊन येथील प्रख्यात व सुशिक्षित फालक कुटुंबाने आजीवन मांसाहार त्याग करण्याचा दृढनिश्चय केला आहे. ही घटना अशक्यप्राय ठरावी अशी असूनही, ठाम श्रद्धा आणि दृढ मनोबलाच्या जोरावर ती शक्य झाली आहे. विजय फालक, शिक्षणक्षेत्र व सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असलेले व्यक्तिमत्त्व, यांच्यासह त्यांच्या परिवाराने या महत्त्वपूर्ण संकल्पाची शपथ घेतली.
यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, जयलक्ष्मी अकॅडमीचे संचालक व अवघ्या १९ वर्षीय जय फालक याने केवळ मांसाहार त्यागच नव्हे तर आजन्म मद्यपान, धूम्रपान, गुटखा, तंबाखू, हुक्का सेवन आणि जुगार यांसारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प साध्वींसमोर स्वतःहून व्यक्त केला. या त्यागामुळे तरुण पिढीसाठी आदर्श घालून दिला असल्याचे मानले जात आहे. तसेच बाहेरगावी एम.बी.ए. चे शिक्षण घेत असलेली लावण्या फालक हिनेही मांसाहाराचा त्याग करून युवती वर्गासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला.
कुटुंब प्रमुखांचा भावनिक प्रतिसाद
या निर्णयानंतर ताप्ती पब्लिक स्कूलच्या शिक्षिका व कुटुंब नायिका सौ. पुनम फालक यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “स्वामीसमर्थांच्या कृपेने आमच्या कुटुंबाने ही अशक्यप्राय वाटणारी बाब साध्य केली आहे. आम्ही हा वारसा पुढेही चालवत राहू व समाजातील इतरांनाही या व्यसनांपासून दूर राहण्यास प्रवृत्त करू.” त्यांच्या या कृतीमागे ज्येष्ठ सुश्राविका व स्वाध्यायी सौ. शोभा ललवाणी यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभली. त्यांनीही या संकल्पाबद्दल फालक परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन करून, “माझ्या इच्छेला मान देत कुटुंबाने घेतलेला हा निर्णय समाजासाठी एक दीपस्तंभ ठरेल,” असे मत व्यक्त केले.
मान्यवरांचा गौरवोद्गार
या अध्यात्मिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे समाजातील मान्यवरांनी मनःपूर्वक स्वागत केले. जैन कॉन्फरन्सचे प्रेमभाऊ कोटेचा, चातुर्मास समिती अध्यक्ष व टॅक्स कन्सल्टंट प्रशांत कोटेचा, आनंद ड्रेसचे संचालक सुनील कोटेचा, सोसायटी साडी सेंटरचे हेमंत मंडलेचा, कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी, डॉ. संजय गादिया, विजय गादिया, दिनेश संचेती, मदनलालजी ललवाणी, शिवसेना नेते ललित मुथा, प्रा. आर. टी. सुराणा, डॉ. संदीप कोटेचा, सचिन डेलीवाल, सौ. पारस नाहाटा, सौ. ज्योती गादिया, सौ. संगीता मुगदिया, सौ. मंगला कोटेचा आदींनी या कुटुंबाचे अभिनंदन करून “अशी दृढ संकल्पना समाजातील अनेकांना प्रेरणा देईल” असे गौरवोद्गार काढले.
समाजासाठी आदर्श
आज युवक वर्ग अधःपतनाकडे भरकटताना दिसत असताना फालक कुटुंबाने मांसाहार व व्यसनांचा त्याग करून समाजासाठी एक अनोखा व अनुकरणीय आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांच्या या कृतीमुळे पुढील पिढ्यांनाही प्रेरणा मिळणार असून, भुसावळ शहरात या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.