पारोळा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांची धडक कारवाई, आरोपीस सात दिवस पोलीस कोठडी
पारोळा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पारोळा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ५३ वर पोलिसांनी आखलेला सापळा यशस्वी ठरला. पोलिसांनी अफूची तस्करी करणाऱ्या शैतानाराम मानाराम बिष्णोई (वय ३४, रा. ढाणीया बालेसर, जि. जोधपूर, राजस्थान) याला अटक केली. त्याच्याकडून एकूण ५० लाख ८२ हजार ९४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीच्या तस्करीची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ कारवाई करत म्हसवे गावाजवळील रामदेव राजस्थानी ढाबा परिसरात सापळा रचला. तपास पथकात निरीक्षक अशोक पवार, एपीआय योगेश महाजन, अमोल दुकळे, डॉ. शरद पाटील, सुनील हटकर, महेश पाटील, प्रवीण पाटील, संजय पाटील, संदीप सातपुते, निलेश साळुंखे, मिथुन पाटील, भूषण पाटील, आशिष गायकवाड, तुषार सोनवणे, अजय बविस्कर, आकाश पाटील, अभिजित पाटील, देवेंद्र धरवडे, सुनील पाटील व गोपाळ पाटील यांचा समावेश होता.
तपासात समोर आले की, आरोपी शैतानाराम बिष्णोईकडून १६४ किलो अफू (१३ गोण्या) जप्त करण्यात आले असून त्याची बाजारातील किंमत १३ लाख १७ हजार ४७२ रुपये असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, दोन ट्रक जप्त करण्यात आले, ज्यामध्ये २० लाख रुपये व १५ लाख रुपयांचा समभाग होता. त्याशिवाय आरोपीकडून २ लाख ५५ हजार ४७० रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली.
ही माहिती मिळाल्यानंतर शरद पाटील यांच्या फिर्यादीवरून तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास अजूनही गुप्तपणे सुरू असून, पोलिस अधिक तपशील लवकरच उघड करणार आहेत.