जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्ह्यातील बिलवाडी गावात रविवारी दुपारी एका जुन्या वादातून दोन्ही कुटुंबांमध्ये भयंकर हाणामारी झाली. या संघर्षात एकनाथ निंबा गोपाळ (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर एकूण ११ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जुन्या वादातून स्फोटक संघर्ष..
बिलवाडी गावातील गोपाळ व पाटील कुटुंबांमध्ये सुमारे १० वर्षांपूर्वी पासूनच वाद सुरू होता. शनिवारी रात्री पाटील कुटुंबातील तरुणांनी गोपाळ कुटुंबातील एका व्यक्तीची दुचाकी अडवून वाद सुरु केला होता. तेव्हाही थोडक्यात शाब्दिक तणाव झाला होता. रविवारी दुपारी एकनाथ गोपाळ व त्यांचे कुटुंबीय ग्रामपंचायतीच्या बांधकामावर काम करण्यासाठी गेले होते. तेथेच पाटील कुटुंबाचे काही सदस्य आले. यावेळी दोन्ही गटांमध्ये पुन्हा वादविवाद सुरू झाला. हा वाद हाणामारीत रुपांतरित झाला. बांधकाम साहित्य, पावडी व लाकडी दांड्यांचा वापर करून संघर्ष करण्यात आला. या मारामारीत एकनाथ गोपाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जखमींचा तपशील..
जखमींमध्ये किरण देविदास पाटील (वय 28), मिराबाई सुभाष पाटील (वय 45), ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील (वय 40), दीपक ज्ञानेश्वर पाटील (वय 23), संगीता रोहिदास पाटील (वय 40), जनाबाई एकनाथ गोपाळ (वय 55), एकनाथ बिलाल गोपाळ (वय 35), गणेश एकनाथ गोपाळ (वय 23), भीमराव एकनाथ गोपाळ व कमलेश प्रमोद पाटील (वय 26) यांचा समावेश आहे.
संतप्त कुटुंबियांचा निषेध..
घटनेनंतर गोपाळ कुटुंबिय व नातेवाईक रुग्णालयात संतप्त झाले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. “जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. प्रशासनाने अनुचित परिस्थिती टाळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.