जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- उत्तर व मध्य महाराष्ट्रातील क्रिकेट पंचांचे कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दोन दिवसीय क्रिकेट पंच कार्यशाळेचे आयोजन दिनांक १३ व १४ सप्टेंबर २०२५ रोजी जळगाव येथील जैन हिल्स वरील सुबीर बोस हॉल मध्ये करण्यात आले. या कार्यशाळेत जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर व छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांतून एकूण ४५ पंचांनी सक्रिय सहभाग घेतला.
कार्यशाळेचे उद्घाटन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्री अरविंद देशपांडे यांनी केले. प्रशिक्षक म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पंच पॅनलशी संबंधित अनुभवी प्रशिक्षक अजय देशपांडे (छत्रपती संभाजी नगर), संदीप चव्हाण (नाशिक), मंगेश नार्वेकर (रत्नागिरी) व संदीप गांगुर्डे (जळगाव) यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.या दोन दिवसीय कार्यशाळेत क्रिकेटच्या बदललेल्या नियमांची सखोल माहिती व त्यांचे अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला. तसेच पंचांमधील परस्पर चर्चा व अनुभवसत्राद्वारे विविध परिस्थितींवर निर्णय घेण्याच्या कौशल्यावर भर देण्यात आला. कार्यशाळेच्या शेवटी उपस्थित पंचांना ५० गुणांची रिव्हिजन टेस्ट दिली गेली.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी विशेष गौरव व सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी जळगावचे संदीप गांगुर्डे यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पंच परीक्षा उत्तीर्ण करून बीसीसीआय पंच पॅनलमध्ये समाविष्ट झाल्याबद्दल मानपत्र व सन्मान देण्यात आला. त्याचप्रमाणे जळगावचे दोन पंच वरुण देशपांडे व मुश्ताक अली यांचा महाराष्ट्र क्रिकेट पंच पॅनलमध्ये समावेश झाल्याबद्दलही गौरव करण्यात आला. मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या पंचांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी निवृत्त होणाऱ्या नाशिकचे पंच व्हॅलेन्टाईन मार्कंडो यांचाही विशेष सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. त्यांचे पंच प्रवासातील कामगिरीबाबत संदीप चव्हाण यांनी माहिती दिली.महाराष्ट्र राज्य १६ वर्षाआतील मुलांच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी उपस्थित पंचांशी संवाद साधला. क्रिकेटच्या नियमांनुसार निष्पक्ष निर्णय घेण्याचे महत्त्व अधोरेखित करत पंच आणि खेळाडूंमधील अंतर कमी करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल आभार व्यक्त करत अजय देशपांडे यांनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे विशेष कौतुक केले. तसेच संदीप गांगुर्डे यांनी पंच प्रवासात जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पाठिंब्याची व सहकार्याची विशेष नोंद घेतली. त्यांनी प्रथम पंच परीक्षा उत्तीर्ण होऊन लगेचच खान्देश सेंट्रल क्रिकेट स्पर्धेच्या तांत्रिक समितीची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे अधोरेखित केले.
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव व जिल्ह्याचे प्रथम अधिकृत पंच यांनी पंच कार्यशाळा आयोजित होऊन ज्ञानवर्धनाचे सुवर्णमौक उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच पंचांनी नेहमीच तटस्थ राहून निष्पक्षता राखावी, तसेच फलंदाजाचे भविष्य ठरवताना पहिल्या क्षणी वाटलेल्या (बाद किंवा नाबाद) निर्णयावर ठाम राहण्याचा सल्ला दिला.