Tuesday, September 16, 2025
police dakshta logo
Homeक्राईमदोन सराईत गुन्हेगारांसह दहा जणांना अटक ; बारा लाखांच्या चोरीचा पर्दाफाश

दोन सराईत गुन्हेगारांसह दहा जणांना अटक ; बारा लाखांच्या चोरीचा पर्दाफाश

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यातील निंभोरा, सावदा, यावल, रावेर आणि मुक्ताईनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची, तोलकाट्यावरून बॅटरी इन्व्हर्टर, मोटारसायकल तसेच कार चोरीसंबंधी घटना वाढत चालल्या होत्या. या घटनांमुळे शेतकरी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते. अखेर निंभोरा पोलीस स्टेशनच्या प्रभारी हरीदास बोचरे यांच्या अथक आणि सखोल तपासानंतर तब्बल १२ लाख रुपयांच्या चोरीचा मोठा साठा जेरबंद करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी एकूण १० गुन्हे उघडकीस आणले आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे सराईत टोळीवर कारवाई..
निंभोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी हरीदास बोचरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मागील १५ दिवसांपासून नाकाबंदी, रात्रगस्त आणि तांत्रिक तपासण्या राबवून गुप्त माहितीच्या आधारे कारवाईची तयारी केली होती. या चौकशीत विलास उर्फ काल्या सुपडू वाघोदे या मुख्य संशयित आरोपीचा मागोवा घेतला गेला. पोलीस आल्याची चाहुल मिळताच तो फरार झाला; मात्र त्याची सहकारी महिला योगिता कोळी हिला ताब्यात घेतले गेले. तिच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, चोरीचा माल विकत घेणाऱ्या मुख्य सूत्रधार स्वप्नील वासुदेव चौधरील याला अटक करण्यात आली. त्याच्या घराची आणि गोदामाची झडती घेतली असता त्याच्या जवळ मोठ्या प्रमाणात चोरीचा माल सापडला.

एकूण १० गुन्हे उघडकीस ; ७ आरोपी अटकेत…
या प्रकरणी विलास उर्फ काल्या सुपडू वाघोदे हा अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. परंतु पोलीसांनी त्याच्या सोबत असणाऱ्या ९ आरोपींना अटक केली आहे. त्यात योगिता सुनील कोळी, गोपाल संजय भोलनकर, आकाश मधुकर घोटकर, अर्जुन रतनसिंग सोळंकी, जमील अब्दुल तडवी, स्वप्नील वासुदेव चौधरी, राकेश सुभान तडवी, ललित सुनील पाटील आणि राहुल उर्फ मयूर अनिल पाटील. या अटक केलेल्या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शेती उपयोगी साहित्य, ५ टी.पी. पंप, ११ मोठ्या व ३ लहान बॅटरी, ७ इन्व्हर्टर, ४ मोटारसायकल, २ पॉवर ट्रॅक्टर, १ नॅनो कार, २ सोलार प्लेट, ११ मटेरियल बॅग आणि ३ ठिबक नळ्यांचे बंडल असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

निंभोरा, यावल, रावेर, मुक्ताईनगर आणि सावदा परिसरातील १० गुन्हे उघडकीस…
ही कारवाई निंभोरा पोलीस स्टेशनच्या प्रभारी हरीदास बोचरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यान्वित करण्यात आली. या यशस्वी कारवाईत उपनिरीक्षक दीपाली पाटील, ममता तडवी, सुरेश अढायंगे, बिजू जावरे, रिजवान पिंजारी, अविनाश पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सोपान गोरे यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलीस दलाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

फरार आरोपीचा शोध सुरू…
विलास उर्फ काल्या सुपडू वाघोदे या मुख्य आरोपीचा अद्याप शोध सुरू असून, पोलिस त्याला लवकरच अटक करणार असल्याचे सांगितले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या