मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची घटनास्थळी भेट; रस्त्यावर मोर्चा, निवेदनाद्वारे न्यायाची मागणी.
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तालुक्यातील बिलवाडी गावात रविवारी दि. १४ रोजी दोन कुटुंबांमधील जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत ५५ वर्षीय एकनाथ गोपाळ याचा खून झाला, तर ११ जण गंभीर जखमी झाले. मृतदेह ताब्यात न घेतल्याने सोमवारी सकाळी गोपाळ कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी जिल्ह्यात तणाव निर्माण केला. त्यांनी आकाशवाणी चौकात चक्का जाम करून रस्ता रोको आंदोलन केले. नंतर मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन दिले आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचून पोलीस अधिकाऱ्यांना न्यायासाठी आग्रह धरला.या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, बिलवाडी गावात अंत्यविधी सुरू असतानाच काही इसमांनी संशयित आरोपींच्या नातेवाईकांच्या घरात तोडफोड केली. घरातील फ्रीज, दुचाकी व डाळी इत्यादी वस्तू नष्ट केल्या तसेच दुचाकीला आग लावण्यात आली. एका ठिकाणी चारचाकीच्या काच फोडल्या गेल्या आणि दुसऱ्या ठिकाणी जाळपोळीचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण क्षेत्रावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून आतापर्यंत आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र, दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. सदर घटनेतून प्रशासन आणि पोलीस यांचे तत्परतेचे निदर्शन झाले असून, मंत्री गिरीश महाजन यांनी गावकऱ्यांना शांततेचे आवाहन केले आणि न्यायलयीन प्रक्रियेचा विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनीही गावकऱ्यांना आश्वासन दिले की, योग्य न्याय मिळवून देण्यात येईल.
सद्यस्थितीत बिलवाडी गावात शांतीचे वातावरण कायम असून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. परिस्थितीवर पोलीस लक्ष ठेऊन आहेत.