अनुभूती स्कूलमध्ये सीआयएससीई सहावी राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धा भव्यपणे सुरु..
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- अनुभूती रेसिडेन्शियल स्कूलच्या मैदानावर आज सीआयएससीई (Council for the Indian School Certificate Examinations) द्वारे आयोजित सहावी राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व अनुभूती स्कूलचे प्राचार्य श्री देबाशीष दास यांनी उद्घाटन प्रसंगी खेळाडूंना उत्साहवर्धक संदेश दिला. त्यांनी खेळाडूंना आवाहन केले की, “स्पर्धेत सहभागी होऊन अनुभव घेणे आणि त्यातून चांगली कामगिरी करून पदक जिंकण्याची संधी गमावू नये.”
उद्घाटन सोहळ्यात जैन स्पोर्ट्स अॅकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे व महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशनचे अजित घारगे विशेष उपस्थित होते. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षांखालील एकूण ३०० हून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे. स्पर्धा १८ सप्टेंबरपर्यंत विविध प्रकारच्या कक्षा व वयोगटांमध्ये सुरू राहणार आहेत.
उद्घाटनाच्या शपथविधीला राज्यभरातून आलेल्या खेळाडूंनी भव्य मार्च पास्ट सादर केले. बिहार, झारखंड, ओडिसा, तमिळनाडू, पांडिचेरी, अंडमान निकोबार, केरळ, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील संघांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात मशाल प्रज्वलन सोहळ्यात प्राचार्य देबाशीष दास व तायक्वांडो राष्ट्रीय विजेतेपदप्राप्त शेजल श्रीमल यांनी संयुक्तपणे मशाल प्रज्वलित केली. नंतर शेजल श्रीमल यांनी खेळाडूंना शपथ दिली.
कार्यक्रमात अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी गाणे “दिल ये जिद्दी है…” सादर करून वातावरण रंगून टाकले. शिवफुले मर्दानी आखाड्याच्या विद्यार्थिनींच्या दमदार प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे मन मोहून घेतले.
प्राचार्य देबाशीष दास यांनी उद्घाटन भाषणात सांगितले की, सीआयएससीईच्या माध्यमातून जुलै महिन्यात यशस्वीपणे प्री-सुब्रतो राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतरच आता ही राष्ट्रीय पातळीवरची तायक्वांडो स्पर्धा घेण्यात येत आहे. याशिवाय, येत्या ऑक्टोबरमध्ये १६ वर्षांखालील मुलांची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आणि पुढील वर्षी जानेवारीमध्ये भव्य राष्ट्रीय योगासन स्पर्धा अनुभूती स्कूलच्या मैदानावर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्राचार्य दास यांनी अशोक जैन (जैन इरिगेशन अध्यक्ष), अतुल जैन (अनुभूती स्कूल अध्यक्ष), सौ. निशा जैन (संचालिका) यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आयोजित केल्याचे सांगितले आणि प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
महाराष्ट्र संघात अनुभूती स्कूलच्या तीन खेळाडूंचा सहभाग
पलक सुराणा, सुमृद्धी कुकरेजा व अलेफिया शाकीर महाराष्ट्र संघात राष्ट्रीय पातळीवर सहभाग घेतला.या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे तीन खास खेळाडू महाराष्ट्र संघात सहभागी होत आहेत. पलक सुराणा, सुमृद्धी कुकरेजा आणि अलेफिया शाकीर या खेळाडू १९ वर्षांखालील वयोगटात राज्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या गुणवत्तेची प्रशंसा होत असून, त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली आहे.
स्पर्धेचा पुढील टप्पा बुधवारी, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता अनुभूती स्कूलच्या बॅडमिंटन हॉलमध्ये क्रीडागण पूजन समारंभाने सुरू होईल. त्यानंतर विविध वयोगटात व वर्गीकरणानुसार स्पर्धा होणार आहेत.