होमिओपॅथी पदवीधरांना नोंदणीची परवानगी ; इंडियन मेडिकल असोसिएशनचा तीव्र विरोध
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या वादग्रस्त निर्णयाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMAI) जळगाव शाखेने गुरुवारी, दि. १८ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी एकदिवसीय संपाचे आवाहन केले आहे. या संपामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडी आणि रुग्णालये संपूर्णपणे बंद राहणार असून, आपत्कालीन (इमर्जन्सी) सेवा देखील उपलब्ध राहणार नाहीत.
शासनाने ५ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी’ (CCMP) पूर्ण केलेले होमिओपॅथी पदवीधरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (MMC) नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मते, हा निर्णय ‘मिक्सोपॅथीला’ अधिकृत मान्यता देण्याच्या समान असून, त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आयएमएने या निर्णयाला विरोध करत सांगितले की, शासनाने यापूर्वी दि. ११ जुलै २०२४ रोजी अशा नोंदणीला स्पष्टपणे मनाई केली होती. त्यामुळे अचानक घेतलेला हा ‘यू-टर्न’ निर्णय धक्कादायक आहे. सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात विचाराधीन असून, न्यायालयाचा अंतिम निकाल येण्याआधी शासनाचा निर्णय हा कायदेशीर प्रक्रियेचा अपमान असल्याचे आयएमएचे मत आहे. आयएमएने नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत, शासकीय रुग्णालये आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भविष्यात रुग्णांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि आधुनिक वैद्यकशास्त्राची अखंडता टिकवण्यासाठी या निर्णयाविरुद्ध संघर्ष करत राहण्याचेही स्पष्ट केले आहे.