Wednesday, October 22, 2025
police dakshta logo
Homeक्राईमजळगाव: तरुणाची निर्घृण हत्या..! हल्लेखोर फरार ; जुन्या वादातून घडला प्रकार..

जळगाव: तरुणाची निर्घृण हत्या..! हल्लेखोर फरार ; जुन्या वादातून घडला प्रकार..

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणाची तलवार आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दि. ३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून मारेकरी फरार झाले आहेत. मृत तरुणाचे नाव ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील (वय २७, रा. कासमवाडी) असे असून त्याचा काही तरुणांसोबत जुना वाद होता.

घटना कशी घडली ?
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री नाना पाटील हा कासमवाडीतील एकता मित्र मंडळाजवळ उभा असताना दोन तरुणांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. जुन्या वादाच्या कारणावरून आरोपींनी त्याच्या पोटावर आणि मांडीवर धारदार तलवार व कोयत्याने वार केले. या हल्ल्यात नाना पाटील गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी त्याला तातडीने खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

रुग्णालयात आक्रोश
या घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, पीएसआय चंद्रकांत धनके यांच्यासह पथकाने शासकीय रुग्णालयात धाव घेतली. यावेळी मृताच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश व्यक्त केला.

गुन्हा दाखल, आरोपी फरार..
या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपी घटनेनंतर फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हद्दीत सर्वत्र तपास मोहीम राबवली आहे.

या हत्याकांडामुळे जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या