चेन्नई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मध्य प्रदेश आणि राजस्थानातील मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा संशय असलेल्या तामिळनाडूतील एका कंपनीच्या औषधाच्या नमुन्यांत भेसळ आढळून आली आहे. संबंधित औषध म्हणजे खोकल्यावर वापरले जाणारे कोल्ड्रिफ सिरप असून, तामिळनाडू अन्नसुरक्षा विभागाने या सिरपचे उत्पादन आणि विक्री थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
तामिळनाडू अन्नसुरक्षा व औषध प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या औषधांच्या नमुन्यांची तपासणी केली असता, कोल्ड्रिफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ असल्याचे निष्पन्न झाले.या औषधाच्या सेवनामुळे मुलांचे मूत्रपिंड निकामी होऊन मुले दगावण्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे कंपनीला तत्काळ उत्पादन थांबविण्याचे आणि बाजारातून साठा परत मागविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, मध्य प्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात सात सप्टेंबर रोजी दोन मुलांचे मूत्रपिंड निकामी होऊन संशयास्पद मृत्यू झाल्याने राज्य सरकारनेही या सिरपच्या विक्रीवर राज्यभर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत केली असून, औषधनिर्मिती कंपनी व वितरकांकडून माहिती मागविण्यात येत आहे.
लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी कफ सिरप आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लहान मुलांना ही औषधे देताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधे देऊ नयेत. तसेच, पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधे सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. कारण, लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही.
सर्व आरोग्य केंद्रे आणि दवाखान्यांनी केवळ उत्तम उत्पादन मानकांनुसार (GMP) तयार केलेली आणि उच्च औषधी दर्जाची कफ सिरप खरेदी करावीत, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद आहे. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सर्व दवाखाने, जिल्हा आरोग्य विभाग, औषध वितरण केंद्रे, प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये तातडीने करावी, असे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.
राजस्थान आणि मध्य प्रदेशात संशयास्पदरीत्या मुलांचे मृत्यू झाल्यानंतर नागपूरसह महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागानेही अलर्ट मोड घोषित केला आहे. औषध विक्रेत्यांना अशा प्रकारच्या सिरपच्या विक्रीबाबत खबरदारी घेण्याचे आणि संबंधित साठ्याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या घटनेमुळे देशभरात पुन्हा एकदा औषधनिर्मिती कंपन्यांच्या गुणवत्तेबाबत आणि बालऔषधांच्या सुरक्षिततेसंबंधी गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
वरिष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.