मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता असून, येत्या काही महिन्यांमध्ये या निवडणुका पार पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महापालिका, नगरपरिषद तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत राज्यभरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 15 ते 20 डिसेंबरदरम्यान जिल्हा परिषद निवडणुका घेण्यात येतील, अशी माहिती समोर येत आहे..राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यकाळ संपून बराच काळ लोटला असून, निवडणुका होण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, उमेदवारांकडून सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश, जनसंपर्क मोहीम आणि संघटनात्मक बैठकींना जोर वाढल्याचे दिसून येत आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका औपचारिकपणे जाहीर केल्या जातील. त्यामुळे येत्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.