मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र शासनाने आज जारी केलेल्या आदेशानुसार भाप्रसे अधिकारी श्री. रोहन घुगे यांची जिल्हा परिषद, ठाणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बदली करून त्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, जळगाव या पदावर करण्यात आली आहे. तर विद्यमान जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी अ.शा.प.क्र. एईओ-११२५/५/२०२५/भाप्रसे-१ या क्रमांकाने आज (दि. ७ ऑक्टोबर २०२५) आदेश निर्गमित केला असून, या आदेशावर अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी स्वाक्षरी केली आहे.
जारी आदेशानुसार, श्री. घुगे यांनी आपल्या विद्यमान पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या सल्ल्यानुसार अन्य अधिकाऱ्याकडे सुपूर्द करून, जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार श्री. आयुष प्रसाद, भाप्रसे यांच्याकडून त्वरित स्वीकारावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, बदलीनंतर रूजू अहवाल Supremo प्रणालीवर (ER Sheet मधील Posting कॉलममध्ये) अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कार्यभार हस्तांतरणाच्या प्रक्रियेत शासनाने दिनांक १७ नोव्हेंबर २०२० रोजी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. नवीन पदावर रूजू झाल्यानंतर पूर्वीच्या पदावरील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल व कार्यमूल्यांकन अहवाल विहीत वेळेत पूर्ण करावेत, असेही निर्देश दिले गेले आहेत.
या आदेशाची प्रत महसूल व वन विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, नाशिक व कोकण विभागीय आयुक्त, श्री. आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव) तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय यांना पाठवण्यात आली आहे. तसेच, या आदेशाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव कार्यालयांनाही माहितीस्तव देण्यात आली आहे.
श्री. रोहन घुगे यांच्या ठाणे येथील कार्यकाळात प्रशासनिक पातळीवर त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. आता ते जळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार असून, त्यांच्या कार्यशैलीकडे जळगाव जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.