चोपडा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- चोपडा तालुक्यातील बुधगाव ते जळोद रस्त्यावर रविवारी दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत असताना ग्राम महसूल अधिकाऱ्यावर ट्रॅक्टरखाली ओढून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे महसूल विभागासह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक आणि मालकाविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध वाळू चोरीची गुप्त माहिती…
तापी नदीच्या बुधगाव ते जळोद या दरम्यानच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू चोरी सुरू असल्याची गुप्त माहिती अमळनेर प्रांत अधिकारी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. या सूचनांनुसार हातेड मंडळ अधिकारी रवींद्र माळी यांच्या नेतृत्वाखाली ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी, संतोष कोळी, वर्डीचे महसूल अधिकारी सुधाकर महाजन, अकुलखेडेचे तिलेश पवार आणि बुधगावचे भूषण पवार यांचे पथक रविवारी पहाटे ४ वाजता बुधगाव येथे कारवाईसाठी रवाना झाले.
ट्रॅक्टर चालकाचा पळण्याचा प्रयत्न…
सकाळी सुमारास सहा वाजता बुधगाव गावाच्या हद्दीत बुधगाव-जळोद रस्त्यावरील पुलाखालील तापी नदीपात्रात पथकाला एक ट्रॅक्टर वाळू भरून येताना दिसला. महसूल पथकाने थांबवून चौकशी केली असता, तो ट्रॅक्टर अजय कोळी यांचा असल्याचे चालकाने सांगितले. महसूल अधिकारी कारवाईस सुरुवात करताच चालक ट्रॅक्टर सोडून पळून गेला.
अधिकाऱ्याला ट्रॅक्टरखाली फेकले…
त्यानंतर संबंधित ट्रॅक्टर जप्त करून चोपडा तहसील कार्यालयात नेत असताना ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी ट्रॅक्टरवर बसले होते. यावेळी ट्रॅक्टर चालक विजय पावरा आणि ट्रॅक्टर मालक अजय कैलास कोळी (दोघेही रा. बुधगाव) यांनी रस्त्यात अडथळा निर्माण करून ट्रॅक्टर पुढे नेऊ नये, असा दबाव आणत अधिकाऱ्यांसोबत वाद घातला. वादाचे रूपांतर काही क्षणांतच हाणामारीत झाले. दरम्यान, चालक विजय पावरा याने अनंत माळी यांची कॉलर पकडून त्यांना ट्रॅक्टरवरून खाली ओढले आणि जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने थेट ट्रॅक्टरच्या मागील चाकासमोर फेकून दिले.
प्रसंगावधानामुळे वाचला जीव…
ही भीषण घटना पाहून मंडळाधिकारी रवींद्र माळी यांनी प्रसंगावधान राखत अनंत माळी यांना तत्काळ बाजूला ओढले, ज्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला. मात्र या झटापटीत अनंत माळी यांच्या पायाला व कमरेस गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर आरोपी चालक विजय पावरा आणि मालक अजय कोळी यांनी ट्रॅक्टरमधील वाळू खाली ओतून ट्रॅक्टर घेऊन घटनास्थळावरून फरार झाले.
गंभीर जखमी अधिकाऱ्यावर उपचार...
जखमी ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी यांना तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंडळाधिकारी रवींद्र माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी चालक विजय पावरा आणि ट्रॅक्टर मालक अजय कोळी यांच्याविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे आणि इतर गंभीर कलमांखाली चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल विभागात संतापाचे वातावरण..
शासकीय अधिकाऱ्यावर वाळू माफियांनी केलेल्या या निर्घृण हल्ल्यामुळे महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली असून या घटनेचा तपास सुरू आहे.