Monday, October 20, 2025
police dakshta logo
Homeजळगावरोटरी महावाचन अभियानात जळगावकरांचा उत्स्फूर्त सहभाग

रोटरी महावाचन अभियानात जळगावकरांचा उत्स्फूर्त सहभाग

१५ हजार मिनिटे वाचन ; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा सहभाग.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आणि वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने रोटरी क्लब जळगाव तर्फे बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी गणपती नगर येथील भारत रत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन नगरी (रोटरी हॉल) येथे “रोटरी महावाचन अभियान” उत्साहात पार पडले. या अभियानात जळगावकरांनी तब्बल १५ हजार मिनिटांचे वाचन करून वाचन संस्कृतीला मोठी चालना दिली.

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते प्रत्यक्ष वाचन करून करण्यात आले. यावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, प्रेम कोगटा, जिल्हा वाचनालयाचे कार्याध्यक्ष सी.ए. अनिलकुमार शाह, गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, सहप्रांतपाल डॉ. अपर्णा भट–कासार, प्रोजेक्ट चेअरमन विजय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. अनिलकुमार शाह यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “वाचन संस्कृतीला चालना देणारा आणि ‘वाचणारं जळगाव’ ही ओळख निर्माण करणारा हा उपक्रम आदर्शवत आहे. अशा उपक्रमाचे दरवर्षी आयोजन व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी वाचन सभागृहास भेट देत स्वतः वाचन करून या उपक्रमात सहभाग नोंदवला. त्यांनी उपक्रमाचे कौतुक करत सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. अभियानादरम्यान “रीडर स्पीक्स” या उपक्रमातून वाचकांना लेखी तसेच ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपात अभिप्राय नोंदविण्याची सुविधा देण्यात आली होती. विशेष सेल्फी पॉईंटवर फोटो काढणे, ‘रीडर्स वॉल’वर स्वाक्षऱ्या करणे आणि कुटुंबीयांसह वाचक कुटुंब म्हणून छायाचित्र घेण्याचा नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला. वाचन सभागृहात मान्यवर व्यक्तींचे प्रेरणादायी सुविचारही लावण्यात आले होते.

सायंकाळी कार्यक्रमाचा समारोप राजेश पाटील (रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट), लिटरसी कमिटी चेअरमन प्रा. शुभदा कुलकर्णी, नॉन मेडिकल कमिटी चेअरमन संदीप शर्मा यांच्या उपस्थितीत झाला. आगामी वर्षात रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या सर्व रोटरी क्लबमध्ये हा उपक्रम राबविण्याचा मानस डॉ. राजेश पाटील यांनी व्यक्त केला. रोटरीचे ज्येष्ठ सदस्य कवरलाल संघवी, प्रा. राजेंद्र देशमुख, हरिप्रसाद काळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी केले. आभार मानद सचिव सुभाष अमळनेरकर यांनी मानले, तर सूत्रसंचालन संवाद सचिव आणि प्रोजेक्ट को-चेअरमन पंकज व्यवहारे यांनी केले.

या अभिनव उपक्रमाद्वारे जळगावकरांनी वाचन संस्कृतीची नवी परंपरा रुजवून ‘वाचक शहर’ म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या